पणजी : जमीन हडप आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोवा तसेच कर्नाटकातील कारवार येथील सात ठिकाणी छापे टाकले. पर्वरीतील ‘निओ मॅजिस्टिक’ येथे गोळीबार करून अज्ञात हल्लेखोरांनी कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय चोरी, अपघाताच्या घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
नळातून खाऱ्या पाण्याच्या पुरवठ्यावर कोरगाव ग्रामस्थ संतप्त
भालखाजन-माईण मानशी परिसरात नळाला येणाऱ्या खाऱ्या पाण्याचा प्रश्न ग्रामसभेत चांगलाच तापला. नागरिकांना खाऱ्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने पंचायत व संबंधित शासकीय यंत्रणांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

वेर्णा बायपासवर भरधाव कार उलटून भीषण अपघात
वेर्णा बायपास महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका कारने वाहतूक सिग्नल आणि ‘एआय’ कॅमेऱ्याच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने कार उलटली. या दुर्घटनेत उलटलेल्या कारमधील चारही प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यामध्ये एका महिला प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे.
पणजी येथील ‘सोहो’ क्लबजवळ हाणामारीप्रकरणी ८ जणांना अटक
पाटो-पणजी येथील ‘सोहो’ क्लबजवळ दोन गटांत झालेल्या हाणामारीप्रकरणी पणजी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
सोमवार
‘डिजिटल अरेस्ट’द्वारे लुबाडणाऱ्या दोघांना ईडीची कोठडी
डिजिटल अरेस्टद्वारे सासष्टीतील महिलेची २.६० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईतून फहीम सय्यद व नईम सय्यद या मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे. त्यांना म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच दिवसांची ईडीची कोठडी ठोठावली आहे.
सारझोरा येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
सारझोरा येथे कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीचालक सिकंदर हंडोलना (४२) याचा मृत्यू झाला. तो मूळचा ओडिशा येथील असून सध्या दांडेवाडा चिंचणी येथे राहत होता. सिकंदर हा इलेक्ट्रिक दुचाकीवरून जात असताना समोरून येणार्या अल्टो कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला. इस्पितळात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला.
दक्षिण गोवा बालकल्याण समितीचे तीन सदस्य निलंबित
महिला व बाल विकास संचालनालयाकडून दक्षिण गोवा बाल कल्याण समितीच्या तीन सदस्यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. कामकाजातील प्रक्रियात्मक त्रुटी, कर्तव्यात कसूर आणि निर्णय प्रक्रियेतील पक्षपातीपणाबाबतच्या प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. या समिती सदस्यांकडे कुशावती जिल्ह्याच्या बालकल्याण समिती सदस्यपदाचा अतिरिक्त कार्यभारही होता.
मंगळवार
स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार;बापाला २० वर्षांचा सश्रम कारावास
मुरगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाने तिच्या वडिलांना २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १.३० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. हा निवाडा विशेष न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांनी दिला.
जमीन हडप प्रकरणात ‘ईडी’चे गोवा, कारवारात सात ठिकाणे छापे
गोव्यातील जमीन हडप आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपली कारवाई तीव्र केली. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान, म्हापसा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तारक आरोलकर, फ्रान्सिस क्रास्टो, आसिफ सौदागर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांशी संबंधित गोवा तसेच कर्नाटकातील कारवार येथील एकूण सात ठिकाणी ईडीच्या पथकांनी एकाच वेळी छापे टाकले.
विनालेबल आणलेली २२५ किलो फ्रोजन जांभळे म्हापशात जप्त
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) म्हापसा येथील आंतरराज्य कदंब बसस्थानकावर केलेल्या तपासणीत विनालेबल आणलेला सुमारे २२५ किलो फ्रोजन जांभळांचा साठा जप्त केला. या मालाची किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे.
बुधवार

हुतात्मा स्मृती स्मारकाचे लोकार्पण
पत्रादेवी-पेडणे येथील गोवा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतींना समर्पित हुतात्मा स्मृती स्मारकाचे लोकार्पण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजनाथ सिंह आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गोवा मुक्ती स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या स्वातंत्र्यवीरांवर गोवा सरकारच्या वतीने काढलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
खोर्लीचे सरपंच, उपसरपंच अपात्र
पदाचा गैरवापर आणि आर्थिक हितसंबंध असलेल्या निर्णयांमध्ये सहभाग घेतल्यामुळे तिसवाडीचे गट विकास अधिकारी अनिल धुमस्कर यांनी खोर्लीचे सरपंच गोरखनाथ केरकर आणि त्यांच्या पत्नी उपसरपंच सुप्रिया केरकर यांना पंच म्हणून अपात्र ठरवले. पंच म्हणून दोघांनी कामकाज करणे बंद करावे व पंचायत सचिवांनी आदेशाची कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे.
झुआरीनगरमधील हॉटेलच्या खोलीतून ४ लाखांचे दागिने चोरीला
केरळमधील एका कुटुंबाच्या अनुपस्थितीत, १६ एप्रिल रोजी झुआरीनगर येथील हॉटेलच्या बंद खोलीतून सुमारे ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवार
सासष्टीतील ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी मुंबईतील ‘सीए’सह तिघांना अटक
सासष्टी तालुक्यातील एका महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या फसवणुकीच्या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट (सीए) भूषण मोये याच्यासह शैलेश चव्हाण आणि विलास पवार या तिघा संशयितांना अटक केली आहे.
सांकवाळ खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप, दंड
सांकवाळ येथील मेटा स्ट्रिप्स कंपनीसमोरील निर्जन ठिकाणी डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या संजय यादव (३५) याच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने कन्हैया लाल यादव याला दोषी ठरवले होते. या खुनाच्या गुन्ह्याखाली न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, दीड लाखांचा दंडही ठोठावला आहे.

इमारतीच्या पार्किंगमधील तीन कारसह दुचाकीला आग
नावेली येथे इमारतीखाली पार्किंग केलेल्या गाड्यांना आग लागली. आगीत बीएमडब्ल्यूसह तीन कार व एक दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मडगाव अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यात आले. यात सुमारे एक कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
शुक्रवार
निओ मॅजिस्टिकच्या संचालकावर जीवघेणा हल्ला
गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पर्वरीतील ‘निओ मॅजिस्टिक’ येथे शुक्रवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सहा गोळ्या झाडण्यात आल्या; मात्र सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
पत्रादेवी नाक्यावर ४०० पेट्या दारू जप्त
महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधून पत्रादेवी तपास नाक्यावर दारूच्या ४०० पेट्या जप्त करण्यात आल्या. या पेट्या कांदे, बटाटे पोत्यांखाली लपवण्यात आल्या होत्या. अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत तरुणाची हत्या
दुचाकी चोरीच्या संशयावरून एका अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नुवे येथे घडली. अंदाजे ३० वर्षीय या तरुणाचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.
एफडीएकडून १०५ किलो लाडू जप्त
दक्षिण गोवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत नेसाय येथील सां जुझे द अरियाल औद्योगिक वसाहतीतील विनापरवाना मिठाई कारखान्यावर कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी कारखान्यातून सुमारे २३ हजार २२० रुपये किमतीचे १०५ किलो मोतीचूर लाडू जप्त करून नष्ट केले.
शनिवार
फोंडा येथील महिलेची २२ लाखांची फसवणूक
आर्थिक योजनेत गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फोंडा येथील एका महिलेची २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. गुंतवणुकीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे समजून येताच महिलेने फोंडा पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार केली.
विजेचा धक्का बसून ७ म्हशी दगावल्या
चिंचणी येथील संतामोड्डी परिसरात विजेचा तीव्र धक्का लागून सात म्हशी दगावल्या आहेत. दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक आणि पीडित शेतकऱ्यांनी केला आहे.
न्हयबाग-पोरस्कडे बसला अपघात
मुंबईहून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या एका प्रवासी बसचा न्हयबाग-पोरस्कडे जंक्शन येथे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या निर्माणाधीन क्षेत्रात शिरून अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
लक्षवेधी
राज्यातील विविध ठिकाणी भूखंड आणि फ्लॅट्स देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून ४७ लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी काजल प्रकाश नानोसकर (२५, रा. कुचेली-बार्देश, मूळ गिरकरवाडा-हरमल) हिला अटक केली आहे.
मालमत्तेच्या वादातून बेकायदेशीर जमाव जमवून घरात घुसत महिला आणि तिच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याचा प्रकार मांद्रे येथे समोर आला आहे. याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
जबरदस्तीने, आमिष दाखवून, फसवणुकीने किंवा विवाहाच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी ‘गोवा बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयक, २०२६’ आणण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हे विधेयक विधानसभेत मांडले जाणार आहे. जबरदस्तने धर्मांतर केल्याचे सिद्ध झाल्यास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे.
विद्यार्थ्यांमधील अमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यातील सर्व शिक्षण संस्थांनी आपल्या संकुलाच्या सभोवतालचा ५०० मीटरचा परिसर ‘ड्रग-फ्री झोन’ म्हणून तातडीने लागू करावा, असा स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाने जारी केला आहे.
राज्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया ४ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करा, असा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. या संदर्भात सरकारने जारी केलेला अध्यादेश रद्द करण्यास नकार देऊन याचिका फेटाळून लावली आहे. याबाबतचा आदेश न्या. वाल्मिकी मिनिझीस आणि न्या. हितेन वेनेगावकर या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला.


