शशिकलाताईंचे कार्य पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक : मुख्यमंत्री

पणजीत ‘ताई स्मृती सुगंध’ या ज्योती बांदेकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
शशिकलाताईंचे कार्य पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक : मुख्यमंत्री

पणजीत ‘ताई स्मृती सुगंध’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत ज्योती बांदेकर आणि परेश प्रभू.

पणजी : शशिकलाताई काकोडकर यांनी गोव्याच्या विकासात मोठे योगदान दिले. शिक्षण, उद्योग आणि अर्थ क्षेत्राला दिशा देण्यात त्यांची कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरली. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गुरुवारी पणजीत ‘ताई स्मृती सुगंध’ या ज्योती बांदेकर लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी परेश प्रभू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक जण मुख्यमंत्री होतात; मात्र काहींनाच जनतेकडून कुटुंबातील सदस्याचा सन्मान मिळतो. गोव्यात भाऊसाहेब बांदोडकर, शशिकलाताई काकोडकर, मनोहर भाई पर्रीकर आणि श्रीपाद भाऊ नाईक यांना असा सन्मान मिळाला. शशिकला ताई या संपूर्ण गोमंतकीय जनतेच्या ताई होत्या.
ताईंनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे आज गोव्याच्या शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात प्रगती दिसून येते. त्यांनी गोवा आर्थिक विकास महामंडळ आणि गोवा औद्योगिक विकास महामंडळाची (जीआयडीसी) स्थापना केली, असे सावंत यांनी नमूद केले.
शशिकलाताईंचे पुत्र समीर काकोडकर यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला. त्या कडक शिस्तीच्या आणि तत्त्वनिष्ठ होत्या. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी मालमत्ता खरेदी केली नाही. मुलांना शाळेत जाण्यासाठी सार्वजनिक बसचा वापर करण्याचीच परवानगी होती, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री असताना गोव्यात कॅसिनो आणण्यासाठी दबाव असतानाही त्यांनी परवाने दिले नाहीत. तसेच पक्षांतराला थारा देणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली होती, असेही समीर काकोडकर यांनी सांगितले.
‘हॅण्डशेक’ नको, ‘नमस्कार’ शिकवा
मुख्यमंत्री सावंत यांनी शशिकलाताईंच्या शिस्तप्रिय स्वभावाचा प्रसंग सांगितला. एका शाळेच्या कार्यक्रमात मुले हॅण्डशेक करून पुढे जात असताना ताईंनी प्राचार्यांना मुलांना हॅण्डशेकऐवजी नमस्कार करण्याची संस्कृती शिकवावी, असा सल्ला दिला होता.
नाहीतर मराठीत बोलणार होतो

कार्यक्रमात सुरुवातीला मराठीत बोलण्याचा विचार होता. मात्र, यापूर्वी काही मान्यवर मराठी आणि इंग्रजीत बोलल्याने आपण कोकणीतून बोलत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा