मडगाव : नावेली येथे इमारतीखाली पार्किंग केलेल्या गाड्यांना आग लागली. आगीत बीएमडब्ल्यूसह तीन कार व एक दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मडगाव अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यात आले. यात सुमारे एक कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
नावेलीतील रोझरी स्कूलच्या मागील बाजूला असलेल्या परिसरातील रिबेलो इमारतीच्या तळमजल्यावर पार्क केलेल्या गाड्यांना आग लागण्याची घटना घडली. आग लागण्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. आगीत एका बीएमडब्ल्यू कारसह अल्टो कार जळून खाक झाली तर जीपला आगीच्या झळा पोहोचल्या. याशिवाय एक दुचाकी आगीत भस्मसात झाली. आगीच्या ज्वाळांमुळे लोकांना तळमजल्यावर येणे- जाणे कठीण झाले. तसेच इमारतीच्या वरील मजल्यावर धुराचे लोट जात होते.
आग लागल्यानंतर याची माहिती मडगाव अग्निशामक दलाला देण्यात आली. माहिती मिळताच दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीवर पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणण्यात आली. याशिवाय नागरिकांना इमारतीतून खाली आणण्यात आले.
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मडगाव अग्निशामक दलाला समजलेले नाही. परंतु, आग पहिल्यांदा गाड्यांना लागून नंतर पसरल्याचे समजते.
आगीत तीन कार, एक दुचाकी याशिवाय इमारतीला आगीच्या झळा बसल्याने सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
मडगाव अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण
मडगाव अग्निशामक दलाकडून तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारला लागलेल्या आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. याशिवाय इमारतीमध्ये पसरलेल्या धुरामुळे घाबरलेल्या नागरिकांना सुखरुप खाली आणण्यात आले. याशिवाय लिफ्टमध्ये अडकलेल्या दोघाजणांनाही अग्निशामक दलाने बाहेर काढले. त्यांना श्वासोच्छश्वासाचा त्रास होऊ लागल्याने इस्पितळात नेण्यात आले.


