‘रोबोटिक्स चतुर्थी’ स्पर्धेच्या पत्रकाचे प्रकाशन करताना मंत्री सुभाष शिरोडकर. सोबत इतर.
पणजी : जो देश तंत्रज्ञानाचा स्वीकार करतो, तोच देश पुढे जातो. त्यामुळे गोवा आणि देशाच्या प्रगतीसाठी दर दोन-तीन वर्षांनी शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. गोव्यातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन भविष्यातील संधींसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
क्युरियस माइंडतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संस्थेतर्फे २०२६ साठी ‘रोबोटिक्स चतुर्थी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑटोमेटेड आरती, टॅक माटोळी आणि माऊस बोट या विषयांवर रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी तयार केलेले रिल्स अपलोड करायचे आहेत. २५ सप्टेंबर २०२६ ही रिल अपलोड करण्याची अंतिम तारीख आहे.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित आपल्या ५५ वर्षांच्या अनुभवाचा दाखला देताना शिरोडकर यांनी सांगितले की, गेल्या काही दशकांत शिक्षण आणि अध्यापनाच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी विद्यार्थी शाळेत पाटी आणि पेन्सिल घेऊन जात होते. आता मात्र महाविद्यालयीन शिक्षणात पेन आणि पुस्तकांचा वापरही कमी होत असून, अनेक विद्यार्थी मोबाईल आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून आपली कामे पूर्ण करतात. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तंत्रज्ञानाचा वेग पाहता शिक्षण पद्धतीतही त्याच वेगाने बदल करणे आवश्यक आहे. सध्याचे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे गोव्यातील विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे. भविष्यातील रोजगाराच्या संधी तसेच बदलत्या औद्योगिक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असे शिरोडकर यांनी स्पष्ट केले.
विज्ञान-तंत्रज्ञानाला प्राधान्य
तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्था भविष्यासाठी सक्षम विद्यार्थी घडवतात. ६० ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखा सक्तीची करण्याचा निर्णय घेतल्याचेही मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात जगत असल्याने गोव्यातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करून पुढे जावे, असे आवाहनही त्यांनी केले.


