‘जनरेशन झी’ ची ओळख शिस्तप्रिय, समर्पित पिढी अशी होणे आवश्यक : राजेंद्र आर्लेकर

‘एक राखी सैनिकांसाठी’ कार्यक्रमात प्रतिपादन; देशातील ‘जनरेशन झी’ ची ओळख शिस्तप्रिय, समर्पित पिढी अशी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
7 hours ago
‘जनरेशन झी’ ची ओळख शिस्तप्रिय, समर्पित पिढी अशी होणे आवश्यक : राजेंद्र आर्लेकर

पणजी : देशातील ‘जनरेशन झी’ ची ओळख शिस्तप्रिय, समर्पित पिढी अशी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

गुरुवारी ‘एक राखी सैनिकांसाठी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोव्याचे राज्यपाल पुशापती अशोक गजपती राजू, अभिनेते योगेश सोमण, चैतन्य प्रतिष्ठानच्या अनघा आर्लेकर, पद्मश्री शशी सोनी आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेतर्फे देशाच्या सीमेवरील सैनिकांसाठी राज्यभरातील शाळांमधून ८० हजार राख्या गोळा करण्यात आल्या.

राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडीओ पाहिला. यामध्ये ‘जनरेशन झी’ असणारी महिला सीमेवरील सैनिकांसोबत वाद घालताना दिसते. ती महिला सैनिकांना तुम्हाला आमच्या करातून पगार मिळतो असे म्हणते. हा निव्वळ कृतघ्नपणा आहे. देशाच्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, म्हणून आज सर्वांना बोलण्याची संधी मिळाली आहे. याचा विसर पडता कामा नये.

देशातील ‘जनरेशन झी’ ची ओळख रस्त्यावर येऊन अपशब्द वापरणारी पिढी अशी असू नये. ‘जनरेशन झी’ला देश, समाजाप्रती समर्पित वृत्ती शिकवली पाहिजे.

ते म्हणाले, युवा पिढीत देशप्रेमाची जाणीव पुन्हा एकदा करून देणे आवश्यक आहे. याचा विचार करूनच आम्ही बारा वर्षांपूर्वी ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम सुरू केला होता. आज याची व्याप्ती वाढली आहे हे पाहून आनंद होत आहे. सीमेवरील सैनिक आपल्या प्राणांची पर्वा न करता, डोळ्यात तेल घालून निगराणी करत असतात. कुटुंबापासून दूर राहून हाती बंदूक घेऊन देशाची सेवा करत असतात. अशा सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. ते आपले कर्तव्य आहे हे समजावे यासाठी आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता.

योगेश सोमण यांनी सांगितले की, उरी चित्रपटात मी संरक्षण मंत्री म्हणून स्व. मनोहर भाईंची भूमिका केली आहे. त्यापूर्वी गोव्यात असताना मला एका अनोळखी माणसाने ‘भाई कसो आसा’ असे विचारले होते. यानंतर माझ्या मित्रांनी मी पर्रीकरांसारखा दिसतो असे सांगितले. चित्रपटात त्यांची भूमिका साकारायला मिळाली हे माझे सौभाग्य आहे. आजच्या राखी पौर्णिमेचा कार्यक्रम आपण सर्वांनी देशासाठी काहीतरी केले पाहिजे याची जाणीव करून देणार होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत जबाबदारीचे भान असणे ही आवश्यक असते.

हेही वाचा
सर्व पहा