मडगाव : सांकवाळ येथील मेटा स्ट्रिप्स कंपनीसमोरील निर्जन भागात डिसेंबर २०२२ मध्ये संजय यादव (३५) याची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या कन्हैया लाल यादव याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी एक वर्ष साधा कारावास भोगावा लागणार आहे.
संजय यादव याचा मृतदेह बांधकामाच्या ढिगाऱ्यात पुरलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांकडून चौकशीअंती त्याची ओळख पटली. वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून काही तासात कन्हैया लाल यादव (रा. सांकवाळ, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली. आरोपीने जड वस्तूने संजय यादवच्या डोक्यावर प्रहार करून हत्या केल्यानंतर मृतदेह निर्जन भागात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय दीड लाखांचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी एक वर्ष साधा कारावास भोगावा लागेल. आरोपीने भोगलेल्या कारावासाचा कालावधी शिक्षेच्या कालावधीतून कमी करावा असेही आदेशात नमूद आहे.


