पणजी : गोवा मंत्रिमंडळाने धर्मांतरणविरोधी विधेयकाला मंजुरी दिली असून, पुढील विधानसभा अधिवेशनात विधेयक चर्चेस येण्याची शक्यता आहे. धर्मांतरणविरोधी विधेयकाला कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा या आमदारांनी विरोध दर्शवला आहे. धर्मांतरण विरोधी विधेयकाविरोधात कठोर भूमिका घेऊन सरकारला घेरण्याचा निर्णय विरोधी पक्षाच्या आमदारांनी घेतला आहे.
हे विधेयक म्हणजे जात आणि धर्मामध्ये फूट घालण्याचा प्रयत्न असल्याचा दावा विरोधी आमदारांनी केला आहे. गोव्यात जबरदस्तीने धर्मांतरणविरोधी कायदा अस्तित्त्वात असताना हे विधेयक आणण्याचा सरकारचा हेतू काय, असा प्रश्न विरोधी आमदारांनी उपस्थित केला आहे.
हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, युरी व एल्टन यांनी यावर तीव्र टीका केली आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात हे विधेयक मांडले गेल्यास काँग्रेस त्याला ठामपणे विरोध करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात धार्मीक धर्मांतराची एकही ठोस घटना नोंदवलेली नसताना अशा कायद्याची गरज काय, असा सवाल फेरेरा यांनी केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून यापूर्वीही राज्यात धर्मांतर होत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, धर्मांतराच्या प्रकरणांबाबत आकडेवारी मागितल्यानंतर तीन प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला. त्यापैकी एका प्रकरणाचा पोलिसांनी तपास बंद केला, तर अन्य दोन प्रकरणे उच्च न्यायालयाने रद्द केली, असा दावा त्यांनी केला.
गोव्यात धर्मांतराची प्रकरणे नाहीत : फेरेरा
“राज्यात धर्मांतराची कोणतीही प्रकरणे नसताना हा कायदा आणण्याची गरज काय? ही विधेयकबाजी भाजपच्या कथानकाचा भाग असून, गोव्यात जातीय तणाव निर्माण करून लोकांमध्ये द्वेषाची बीजे पेरण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप फेरेरा यांनी केला.
सभागृहात विरोध करणार : युरी आलेमाव
हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांमध्ये फूट घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आपण अजून पर्यंत विधेयक वाचलेले नाही. जेव्हा ते सभागृहात येणार व त्यावर चर्चा होणार, त्यावेळी आम्ही त्यावर आवाज काढणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
विरोधी आमदार विरोध करणार : एल्टन
भाजप आपल्या फायद्यासाठी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यामध्ये फूट घालू पाहत आहे. आम्ही या विधेयकाला विरोध करतो आणि माझ्यासहीत सात विरोधी आमदार सुद्धा विधानसभेत विरोध करणार असल्याचे आमदार एल्टन डिकॉस्टा म्हणाले.


