विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यास महिलांचे योगदान महत्वाचे : मुख्यमंत्री

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिला, शेतकऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे. राज्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांना सुमारे ४६८ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. गोव्यात दोन ‘क्लस्टर लेव्हल फेडरेशन’ तयार केल्या आहेत. पुढील पिढ्यांसाठी या क्लस्टरचे काम आदर्श ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यास महिलांचे योगदान महत्वाचे : मुख्यमंत्री

पणजी : विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिला, शेतकऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे. राज्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांना सुमारे ४६८ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. गोव्यात दोन ‘क्लस्टर लेव्हल फेडरेशन’ तयार केल्या आहेत. पुढील पिढ्यांसाठी या क्लस्टरचे काम आदर्श ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गुरुवारी पणजीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्राम विकास खात्याच्या दीपाली नाईक, संगम पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत २०४७ चे लक्ष्य ठेवले आहे. आम्ही गोव्यामध्ये २०३७ पर्यंत हे लक्ष गाठण्याचे ठरवले आहे.

यासाठी महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. राज्यात ३५३८ महिला बचत गट आहेत. यामध्ये ४५ हजारहून अधिक महिला काम करत आहेत. या बचत गटांना आतापर्यंत १०.३१ कोटी रुपये रिव्हॉल्विंग तर २९ कोटी रुपये समुदाय फंड देण्यात आला आहे. या बचत गटांना ४६८ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.

ते म्हणाले, २०१४ पूर्वी बचत गटांना एवढे कर्ज मिळणे शक्यच नव्हते. मात्र २०१४ नंतर बँकांनी नरेंद्र मोदींच्या गॅरंटी वर महिला बचत गटांना कर्ज देणे सुरू केले आहे. गोवा राज्य लहान असले तरी पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. येथील साक्षरता शंभर टक्के झाली आहे. स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत.

गोव्यातील डेअरी, कृषी, फलोत्पादन, मत्स्योद्योग क्षेत्रात भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. गोव्यातील सर्व १८ ‘क्लस्टर लेवल फेडरेशन’ आदर्श व्हाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.



हेही वाचा
सर्व पहा