शिरोड्यातील गणेशमूर्तीला थेट मुंबईतून मागणी

लाला च्यारी यांच्या कलाकुसरीला दाद : साचा न वापरता हाताने मूर्ती बनविण्यात हातखंडा

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
28th August, 08:20 pm
शिरोड्यातील गणेशमूर्तीला थेट मुंबईतून मागणी

फोंडा : शिरोडा येथील लाला सूर्य च्यारी हे नामवंत मूर्तिकार गणेश भक्तांच्या विनंतीनुसार साच्याचा वापर न करता केवळ हाताने मूर्ती तयार करण्याची आपली पारंपरिक शैली जोपासत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी यावर्षी साकारलेली एक विशेष गणेशमूर्ती मुंबईतील कुर्ला येथील एका घरात विराजमान होण्यासाठी पूर्णत्वाच्या मार्गावर असून, लाला च्यारींच्या हाताने घडलेली ही पहिलीच मूर्ती गोव्याबाहेर जात आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून लाला च्यारी यांच्याकडे गणेशभक्त केवळ छायाचित्र (फोटो) देऊन अगदी त्याच शैलीत मूर्ती बनवून घेतात. लहानपणापासून कोणतीही साच्याची मदत न घेता ते आपल्या घरी गणेशमूर्ती साकारत आले आहेत. दरवर्षी ते सुमारे १५ ते २० गणेशमूर्ती तयार करून बोरी, शिरोडा, वास्को आणि परिसरातील विविध भागांमधील नागरिकांना मागणीनुसार उपलब्ध करून देतात. याशिवाय गणेशोत्सवासह सरस्वती, दुर्गा आणि इतर धार्मिक मातीच्या मूर्तीही ते स्वतः बनवतात. यावर्षी मुंबईहून आलेल्या मागणीनुसार त्यांनी छायाचित्राच्या आधारावर ही गणेशमूर्ती साकारली असून, पुढील काही दिवसांत ती कुर्ला येथे नेण्यासाठी संबंधित व्यक्ती शिरोड्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिने आधीच अनेक भाविक आपल्या आवडीनुसार हव्या असलेल्या मूर्तीचे छायाचित्र त्यांच्याकडे सुपूर्द करतात. त्या छायाचित्राच्या आधारावर हुबेहूब मूर्ती हाताने साकारली जाते. मुंबईहून आलेल्या विशेष ऑर्डरनुसार तयार केलेली ही मूर्ती गोव्याबाहेर जात असल्याचा विशेष आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना मूर्तिकार लाला च्यारी यांनी व्यक्त केली आहे.
रंगभूमीवरही मोठे योगदान
केवळ मूर्तिकारच नव्हे, तर लाला च्यारी हे एक प्रतिभावान अभिनेते असून त्यांनी आपल्या नाटक क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांनी २५० हून अधिक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. तसेच, भावी पिढीत कलासंस्कार रुजवण्यासाठी ते दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करतात. शिरोडा बाजार येथील स्वतः उभारलेल्या विश्वकर्मा कलामंडपात आयोजित होणाऱ्या या शिबिरांमध्ये परिसरातील ३० ते ४० मुले आवडीने सहभागी होतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्लोक पठण, समूह गीतगायन, तालवाद्य, नृत्य, हस्तकला, चित्रकला, रांगोळी आणि नाट्यकला आदींचे धडे देऊन ते नवीन कलाकार घडवण्यात मोलाचे योगदान देत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा