गोळीबार झालेल्या घटनास्थळी तपास करताना पोलीस. (कैलास नाईक)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पर्वरी
गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पर्वरीतील ‘निओ मॅजेस्टिक’ येथे शुक्रवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सहा गोळ्या झाडण्यात आल्या; मात्र सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. काही फुटेजमध्ये हल्लेखोरांचे चेहरे दिसत आहेत. हल्लेखोरांना लवकर गजाआड करणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे.
राज्याला हादरवणारी ही घटना शुक्रवारी रात्री ९.१५ च्या सुमारास घडली. ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोच्या मागील दरवाज्याबाहेर दोघे हल्लेखोर दबा धरून बसले होते. कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक सुरक्षारक्षकांसोबत आपल्या कारकडे निघाले होते. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी श्रीनिवास नायक यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने नायक आणि त्यांचे सुरक्षारक्षक बचावले. प्रत्युत्तरादाखल नायक यांच्या सुरक्षारक्षकांनी हल्लेखोरांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या; मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी महामार्ग ओलांडून धूम ठोकली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस महानिरीक्षक केशवराम चौरासिया, पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर आणि विश्वेश कर्पे यांनी घटनास्थळाची कसून तपासणी केली. पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. न्यायवैद्यक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी काही नमुने गोळा केले. पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळाचा पंचनामा केला. तपासाच्या अनुषंगाने कॅसिनो परिसरातील, तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघाही हल्लेखोरांचा चेहरा दिसत आहे. हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी पथके स्थापन करून विविध दिशांना रवाना केली आहेत. हल्ला कोणत्या उद्देशाने करण्यात आला हे स्पष्ट होऊ शकले नाही.
हल्ल्यानंतर दुचाकी घेऊन हल्लेखोर पसार
हल्ल्यापूर्वी दोघे हल्लेखोर कॅसिनो जवळील कट्ट्यावर बसले होते. त्यांना कॅसिनोच्या सुरक्षा रक्षकांनी हटकल्यानंतर ते तेथून निघून गेले; मात्र काही वेळाने ते पुन्हा कट्ट्यावर येऊन बसले व थोड्याच वेळात हा हल्ला केला. हल्लेखोरांनी तीन, तर श्रीनिवास नायक यांच्या सुरक्षा रक्षकांनी तीन गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर एक हल्लेखोर कॅसिनोच्या उजव्या बाजूला, तर दुसरा डाव्या बाजूला पळाला. हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकी महामार्गाची पलिकडे आझाद भवननजीक पार्क करून ठेवल्या होत्या. त्या घेऊन हल्लेखोर पर्वरीत पसार झाले. पोलिसांना दोन्ही दुचाकींचे क्रमांक मिळाले असून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.

कारमध्ये बसत असतानाच गोळीबार : श्रीनिवास नायक
मी माझ्या कारमध्ये बसणारच होतो, इतक्यात दोघा हल्लेखोरांनी माझ्यावर तीन गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरादाखल माझ्या अंगरक्षकानेही त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर हायवे ओलांडून ते पसार झाले. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, अशी माहिती निओ मॅजेस्टिकचे संचालक श्रीनिवास नायक यांनी दिली.

हल्लेखोरांना लवकरच गजाआड करू : चौरासिया
घटनेची माहिती मिळताच पोलीस महानिरीक्षक केशवराम चौरासिया घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस कसून तपास करत आहेत. लवकरच हल्लेखोरांना गजाआड करू, असा विश्वास महानिरीक्षक चौरासिया यांनी व्यक्त केला.

दोघेही हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांनी वापरलेल्या दुचाकींचे क्रमांकही पोलिसांना मिळाले आहेत. त्यांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली आहेत. लवकरच हे हल्लेखोरांना गजाआड केले जाईल. हल्लेखोरांच्या चौकशीतूनच जीवघेणा हल्ला करण्यामागील नेमका उद्देश काय होता, हे स्पष्ट होईल.


