२०२७ च्या विधानसभेत फातोर्डासह ३० जागा जिंकणार : भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

२०२७ मधील विधानसभा निवडणुकीत फातोर्डासह राज्यात ३० जागा जिंकण्याचा निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने १३०० भाविकांना वालांकिणी यात्रेसाठी रवाना केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
43 mins ago
२०२७ च्या विधानसभेत फातोर्डासह ३० जागा जिंकणार : भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

मडगाव : भारतीय जनता पक्षाचे संघटन कार्य सर्वांना सोबत घेऊन सुरू असून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ३० जागा निवडून आणण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे. यामध्ये फातोर्डा मतदारसंघाचाही समावेश असून पक्षाध्यक्ष म्हणून राज्यातील सर्व ४० मतदारसंघांतील उमेदवारांना निवडून आणणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले. मडगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी फातोर्डा मतदारसंघ विरोधकांच्या हाती सहजासहजी जाऊ देणार नाही, असा इशारा दिला.



फातोर्डा मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक स्थितीवर भाष्य करताना नाईक यांनी स्थानिक आमदारांवर व विरोधकांवर निशाणा साधला. फातोर्डातील जनता आता खोटेपणाला आणि विकासाच्या देखाव्याला कंटाळली आहे. मतदारसंघात अनेक ठिकाणी जमिनींचे बेकायदेशीर झोन बदलणे, भूखंडांचे रूपांतरण करणे आणि खुल्या जागांवर अतिक्रमणे करण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आपण २००२ आणि २००७ मध्ये निवडून आलो आणि पराभवानंतरही जनतेशी नाते तोडले नाही. आमदार असताना अनेक प्रकल्प आणण्यासोबतच परिसरातील ५९४ लोकांना रोजगार मिळवून दिला, असे त्यांनी नमूद केले.

या वेळी दामू नाईक यांनी आपल्या वैयक्तिक पुढाकारातून आयोजित केलेल्या धार्मिक यात्रेची माहिती दिली. वालांकिणी देवदर्शनासाठी सुमारे १३०० भाविकांना रवाना करण्यात आले असून, यात एकट्या फातोर्डा मतदारसंघातील ८१४ भाविकांचा समावेश आहे. याशिवाय मडगाव, कुंकळ्ळी आणि कुडतरी येथील भाविकांनाही पाठवण्यात आले आहे. ही कोणतीही सरकारी योजना नसून वैयक्तिक स्तरावर केलेली निष्काम समाजसेवा असल्याचे सांगत शुक्रवारी सकाळी १० वाजता मडगाव रेल्वे स्थानकावरून या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा