डिचोली : येथील लाटंबार्से परिसरात 'सिद्धगिरी गुरुकुल ट्रस्ट'कडून सुरू असलेल्या बांधकामावरून स्थानिक गावकर, कोमुनिदादीचे महाजन आणि लाटंबार्से पंचायतीचे लोकप्रतिनिधी प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. सदर बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असून पंचायतीने यापूर्वीच यावर ते पाडण्याची (डेमॉलिशन) नोटीस जारी केलेली आहे. हे प्रकरण सध्या पंचायत उपसंचालकांकडे प्रलंबित असताना, 'गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळा'ने (गोवा IPB) या प्रकल्पाला मंजुरी कशी दिली, असा सवाल उपस्थित करत गावकऱ्यांनी प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्थानिक सरपंच रामा गावकर, पंच सदस्य आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुमारे १०० कोटी रुपयांच्या या भव्य प्रकल्पासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि स्थानिक पंचायतीच्या अधिकारांना पायदळी तुडवण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे स्थानिक पंचायतीचा तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांचा कर व महसूल बुडाला आहे. तसेच, या प्रकल्पासाठी अवघ्या ५ रुपये प्रति चौरस मीटर या अत्यंत नाममात्र दराने जमीन उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला आहे. याशिवाय, येथे उभारण्यात आलेल्या कंपाउंड वॉलमुळे स्थानिकांचे रस्ते आणि पाण्याचे मार्ग बंद झाले असून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
एकीकडे या बांधकामावर पंचायतीचा कायदेशीर आक्षेप असताना, दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने (PWD) या खाजगी प्रकल्पाच्या जोड रस्त्याच्या सुरक्षेसाठी १ कोटी ६६ लाख रुपयांची तांत्रिक मंजुरी दिली असून, रस्ता बांधकामासाठी ७५ लाख रुपये मंजूर केले आहेत. सरकारी निधीचा असा गैरवापर करून बेकायदेशीर बांधकामांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकल्पाचा स्थानिकांना कोणताही फायदा नसून पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने, प्रशासनाने तात्काळ हे काम न थांबवल्यास याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा ठाम इशारा लाटंबार्सेतील गावकऱ्यांनी दिला आहे.


