मडगाव : राज्यातील शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांच्या परिसरात केवळ ५०० मीटर अंतराचा 'ड्रग्जमुक्त क्षेत्र' घोषित करण्याऐवजी संपूर्ण गोवा राज्यच ड्रग्जमुक्त म्हणून घोषित करावे आणि त्यानुसार कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली आहे. शैक्षणिक संस्थांच्या आसपास अमली पदार्थांचा शिरकाव रोखण्यासाठी केवळ मर्यादित उपायांपेक्षा व्यापक सरकारी धोरणाची नितांत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमली पदार्थ विरोधी विभागाच्या (ANC) सूचनेनुसार शिक्षण खात्याने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिघात ड्रग्जमुक्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या परिपत्रकावर आक्षेप नोंदवत आमदार व्हेन्झी म्हणाले की, "अशा प्रकारच्या नियमांमुळे ५०१ मीटर अंतरावर अमली पदार्थ सहज उपलब्ध होऊ शकतात, असा चुकीचा संदेश जातो. त्यामुळे या परिपत्रकात तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे." विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यातून खऱ्या अर्थाने दूर ठेवायचे असेल, तर केवळ शाळांच्या परिसरापुरते मर्यादित न राहता संपूर्ण गोव्यात अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि सेवन यावर रोख लावण्यासाठी राज्यव्यापी कारवाई होणे आवश्यक आहे.
गोवा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी, राज्यात अमली पदार्थांची वाढती समस्या ही चिंतेची बाब बनली आहे. या समस्येमुळे राज्याची प्रतिमा मलीन होत असून स्थानिक तरुणांचे भवितव्य गंभीर धोक्यात आले आहे. त्यामुळे सरकारने केवळ ५०० मीटरच्या मर्यादेपुरती उपाययोजना न करता 'ड्रग्जमुक्त गोवा' हेच अंतिम व व्यापक उद्दिष्ट समोर ठेवून ठोस कृती आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असा आग्रह आमदार व्हेन्झी यांनी धरला आहे.


