काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर उंच पर्वतरांगांमधून वाहणार हिमनदीतून दोन हजार फुटांचा हिमकडा सरळ ४ हजार फूट खाली कोसळला. आणि बर्फ, दगड, माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा तयार झाला. त्यानंतर हा लोंढा १०० फूट उंचीच्या लाटेत रुपांतरित होऊन प्रचंड वेगाने पुढे सरकत त्रिशुली नदीत मिसळला. नेपाळच्या भौगोलिक स्थितीनुसार हा भाग डोंगराळ आणि अरुंद असल्याने मलब्याचा प्रवाह आणखी वेगाने पुढे आला. काही कळण्याच्या आतच लोंढा शहरांत, गावांमध्ये घुसला आणि होत्याचे नव्हते झाले.
या नैसर्गीक आपत्तीने सध्या अनेकांना चक्रावून सोडले आहे. एवढी मोठी विध्वंसकारी आपत्ती आली कशी आणि एका क्षणात देशविदेशातील अनेकांच्या स्वप्नांचा कायमचा चुराडा करून कशी गेली, याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पावसाचा एक थेंबही पडला नसताना नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि आपत्तीमागील वरील खरे कारणही पुढे आले आहे. इशारा: अडथळ्यामुळे तयार झालेल्या सरोवरामुळे आणखी मोठा महापूर येणार असल्याचा इशारा चीनने दिला आहे.

हिमनग कोसळल्याने हादरली जमीन
या घटनेनंतर सुरुवातीला अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने (USGS) सीमेजवळ ४.४ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद केली होती. मात्र, नंतरच्या तपासणीत हा भूकंप नसल्याचे स्पष्ट झाले. हिमनग आणि खडकाचा मोठा भाग तुटून दरीत कोसळल्याने निर्माण झालेल्या हालचालीमुळे भूकंपासारखे भूकंपीय संकेत नोंदवले गेल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सुमारे ५,२०० मीटर उंचीवर हिमनगाचा खालचा भाग तुटून तब्बल १,२०० मीटर खाली कोसळला. कोसळताना त्यात मोठ्या प्रमाणात खडक-माती मिसळली. या प्रचंड वेगामुळे बर्फाचे तुकडे आणि खडक चिरडत मोठ्या प्रमाणात पाण्यात परिवर्तित झाले.

ल्हेंदे नदीला आला महापूर
हिमनग कोसळण्यामुळे निर्माण झालेला प्रचंड पाण्याचा प्रवाह ल्हेंदे नदीत शिरला. त्यानंतर या प्रवाहाने नेपाळ, तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणला. अनेक प्रवासी, गिर्यारोहक आणि कैलास यात्रेसाठी निघालेले भाविक या आपत्तीत अडकले.

मोठे सरोवर धोकादायक स्थितीत; प्रशासनाची चिंता वाढली
महापुराच्या प्रवाहासोबत वाहून गेलेले मृतदेह शेकडो किलोमीटर अंतरावर आढळून आले आहेत. दरम्यान, तिबेटमध्ये निर्माण झालेले एक मोठे सरोवर अद्याप धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मृतांचा आकडा ४६९ च्या वर
या आपत्तीतील मृतांची संख्या ४६९ च्या वर पोहोचली आहे. १५०० जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. बेपत्ता असलेल्यांत २९० भारतीयांबरोबरच अनेक देशांतील विदेशी नागरिकांचा समावेश आहे. पर्वतरांगांत पर्यटक, गिर्यारोहक म्हणून आलेले या आपत्तीत सापडले आहेत. त्यातील काहीजणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकांचा शोध घेणे सुरू आहे. भारताने आपला मदतीचा हात पुढे केला आहे. अन्य देशांतूनही मदतीचा ओघ सुरू झाला आहे.


