सासष्टीतील ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी मुंबईतील ‘सीए’सह तिघांना अटक

मुख्य सूत्रधारांच्या साथीदारांच्या आवळल्या मुसक्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th August, 11:18 pm
सासष्टीतील ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी मुंबईतील ‘सीए’सह तिघांना अटक

सासष्टी तालुक्यातील एका महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल २ कोटी ६० लाख ३३ हजार ६३४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट (सीए) भूषण मोये याच्यासह शैलेश चव्हाण आणि विलास पवार या तिघांना ईडीने अटक केली आहे. हे तिघेही या फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचे सहकारी असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने ९ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. सासष्टी तालुक्यातील एका महिलेने याबाबत तक्रार दिली होती. संशयितांनी आपण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून संबंधित महिला आणि तिच्या पतीला ‘डिजिटल अरेस्ट’ केले.

संशयितांनी संबंधित दाम्पत्याचे जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले. गोयल यांनी मुंबईतील कॅनरा बँकेत महिलेच्या नावावर खाते उघडून त्यात ६ कोटी रुपये जमा केल्याचे भासवण्यात आले. ही रक्कम मनी लाँड्रिंगशी संबंधित असल्याचे सांगून संशयितांनी त्यांच्याकडून तब्बल २ कोटी ६० लाख ३३ हजार ६३४ रुपये उकळले, असे तक्रारीत म्हटले आहे.

ईडीची छापेमारी आणि कोट्यवधींची जप्ती

१) या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा संशय आल्याने ईडीने चौकशी सुरू केली. विविध ठिकाणी केलेल्या छाप्यांमध्ये ईडीने ८० लाख रुपयांची रोकड, १.२४ कोटी रुपयांचे विदेशी चलन, १.३१ कोटी रुपये किमतीचे सोने आणि १४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सुमारे १०० बनावट रबर स्टॅम्पही जप्त करण्यात आले आहेत.

२) पैसे वळवण्यासाठी वापरलेली ४०० हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या सिंडिकेटने बँकिंग चॅनेलद्वारे तब्बल २७ हजार कोटी रुपयांचे, तर सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे व्यवहार रोखीने केल्याचे तपासात उघड झाले आहे.

३) याशिवाय ३.२५ कोटी रुपयांची रोकड, आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल पुरावेही जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुख्य सूत्रधारांनंतर साथीदारांना अटक

ईडीने २३ ऑगस्ट रोजी मुंबईत कारवाई करून फहीम सय्यद आणि नईम सय्यद या या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक केली होती. त्यांना गोव्यात आणून म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

त्यांच्या चौकशीत मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट भूषण मोये हा त्यांना मदत करत असल्याचे, तसेच शैलेश चव्हाण आणि विलास पवार हे दोघे फसवणुकीची रक्कम विविध एटीएममधून काढून मुख्य सूत्रधारांना देत असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीला सहकार्य न केल्याचा आरोप

तपासात ही माहिती समोर आल्यानंतर ईडीने भूषण मोये, शैलेश चव्हाण आणि विलास पवार यांना समन्स बजावून गोव्यात चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते चौकशीला सहकार्य करत नसल्याने गुरुवारी रात्री या तिघांनाही अटक करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

फसवणुकीची रक्कम काढून देण्याची भूमिका

ईडीच्या तपासानुसार, शैलेश चव्हाण आणि विलास पवार हे फसवणुकीतून मिळालेली रक्कम विविध एटीएममधून काढून मुख्य सूत्रधारांना देत होते. तर सीए भूषण मोये हा मुख्य सूत्रधारांना मदत करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या भूमिकांबाबत पुढील तपास ईडीकडून सुरू आहे.

आतापर्यंत पाच जणांना अटक

या प्रकरणात ईडीने आधी मुख्य सूत्रधार फहीम सय्यद आणि नईम सय्यद यांना अटक केली. त्यानंतर भूषण मोये, शैलेश चव्हाण आणि विलास पवार या तिघांना अटक करण्यात आली. त्यामुळे या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जण ईडीच्या कारवाईच्या कक्षेत आले आहेत.

हेही वाचा
सर्व पहा