दिल्ली पोलिसांकडून पाकिस्तानी हेरगिरीचे जाळे उद्ध्वस्त

आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या दाम्पत्याला अटक; भारतीय सिमकार्ड पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या नॉर्दर्न रेंजने पाकिस्तानस्थित गुप्तचर (ISI) यंत्रणेशी संबंधित असल्याचा आरोप असलेले हेरगिरीचे जाळे उघडकीस आणले आहे. या प्रकरणात दिल्लीतील एका तरुण दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. (Delhi Police Special Cell busts ISI-backed Pakistan espionage module, arrests couple) मोहम्मद साहिल आणि त्याची पत्नी समीरा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
45 mins ago
दिल्ली पोलिसांकडून पाकिस्तानी हेरगिरीचे जाळे उद्ध्वस्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या नॉर्दर्न रेंजने पाकिस्तानस्थित गुप्तचर (ISI) यंत्रणेशी संबंधित असल्याचा आरोप असलेले हेरगिरीचे जाळे उघडकीस आणले आहे. या प्रकरणात दिल्लीतील एका तरुण दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. (Delhi Police Special Cell busts ISI-backed Pakistan espionage module, arrests couple)  मोहम्मद साहिल आणि त्याची पत्नी समीरा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे दाम्पत्य २०२४ पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. आरोपींनी पाकिस्तानी हेरांना मदत करण्यासाठी भारतीय सिमकार्ड मिळवून ती दुबईमार्गे पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे.

आठ सिमकार्डसाठी मिळाले ३० हजार रुपये

२०२४ आणि २०२५ या कालावधीत आरोपींनी तब्बल आठ भारतीय सिमकार्ड पाकिस्तानला पाठवली. त्यासाठी त्यांना सुमारे ३० हजार रुपये मिळाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या सिमकार्डच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये व्हाॅट्सॲप खाती सक्रिय करण्यात आली. त्यानंतर या भारतीय क्रमांकांचा वापर करून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांनी भारतीय व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये प्रवेश मिळवत संवेदनशील माहिती गोळा केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानी एजंटशी संपर्क

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलचा २०२४ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका पाकिस्तानी एजंटशी संपर्क झाला. त्याची ओळख त्याची पत्नी समीरा हिच्या माध्यमातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुढे या एजंटने दोघांची पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी ओळख करून दिली. आर्थिक लाभाचे आमिष दाखवत त्यांना या नेटवर्कमध्ये सहभागी करून घेतल्याचा आरोप आहे. साहिल आणि समीरा यांना नेटवर्कसाठी लॉजिस्टिक मदत करणे तसेच आणखी व्यक्तींना हेरगिरीच्या कामासाठी जोडणे अशी कामे देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट परिसराची रेकी करण्याचेही काम

साहिलवर देशातील विविध ठिकाणच्या लष्करी कॅन्टोन्मेंट परिसरांची पाहणी व माहिती गोळा करण्यासाठी व्यक्तींची भरती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच लष्करी कर्मचाऱ्यांशी संबंधित आणि न्यायाधिकरणांमध्ये प्रलंबित असलेल्या कोर्ट-मार्शल प्रकरणांची माहिती मिळवण्याचाही प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. साहिलच्या चौकशीनंतर त्याची पत्नी समीरा हिलाही भारतीय सिमकार्ड पाकिस्तानी घटकांना पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.

मोबाईलमध्ये संशयास्पद व्हाॅट्सॲप  संभाषणे

दोन्ही आरोपींच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासणीत पाकिस्तानी हँडलर्ससोबत झालेली संशयास्पद व्हाॅट्सॲप संभाषणे आढळल्याचा दावा स्पेशल सेलने केला आहे. या प्रकरणात दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, या कथित हेरगिरी नेटवर्कची रचना, कार्यपद्धती, स्थानिक मदतनीस आणि स्लीपर सेलशी असलेले संबंध यांचा तपास सुरू आहे. या नेटवर्ककडून भारतातील व्यक्तींशी एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्क साधला जात असल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा