‘मन की बात’- १३९वा भाग | सणासुदीला स्थानिक विक्रेत्यांकडूनच वस्तू खरेदी करा : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला १२ वर्षे पूर्ण झाली. आजच्या १३९ व्या भागात त्यांनी जनतेला स्थानिक उत्पादनांच्या खरेदीवर भर देण्याचे आवाहन केले. डिचोलीत या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मन की बात कार्यक्रमात गोव्याचा अनेकदा उल्लेख झाल्याचे नमूद करत अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
1 hours ago
‘मन की बात’- १३९वा भाग | सणासुदीला स्थानिक विक्रेत्यांकडूनच वस्तू खरेदी करा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाच्या १३९ व्या भागाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्योहारोंच्या या पवित्र प्रसंगी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्थानिक कारागीर आणि उत्पादकांकडून सामान खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे तळागाळातील कारीगर आणि स्थानिकांचा उत्साह द्विगुणित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतभरातील स्थानिक उत्पादनांची वैश्विक बाजारपेठेतील मागणी वेगाने वाढत असून बिहारच्या पूर्णियामधील मखाना आता ग्रीसपर्यंत आणि कर्नाटकच्या कलबुर्गीची अरहर डाळ मालदीवपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी कौतुकाने नमूद केले. या जागतिक विस्तारामुळे देशातील शेतकरी वर्गासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन आणि सुवर्ण संधी उपलब्ध होत आहेत.



 १२ वर्षांपूर्वी विजयादशमीच्या शुभ पर्वावर सुरू झालेली ‘मन की बात’चा प्रवास त्यांच्यासाठी देशवासीयांना अधिक जवळून जाणून व समजून घेण्याची एक तीर्थयात्रा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. खादीच्या विक्रमी विक्रीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गांधी जयंतीनिमित्त केवळ एकाच दिवसात खादी ग्रामोद्योगच्या उत्पादनांची विक्री २८ कोटी रुपयांपेक्षा अधिक नोंदवली गेली, जी मागील वर्षाच्या तुलनेत दीड कोटी रुपयांनी अधिक आहे. याशिवाय स्वातंत्र्य सैनिक परमानंद यांच्या १५० व्या जयंतीचा विशेष उल्लेख करत त्यांनी आर्य समाज व इतर सामाजिक चळवळीतील त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. दक्षिण अफ्रीका व गयानामध्ये कार्य करणाऱ्या परमानंद यांनी स्वातंत्र्यलढ्यात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती आणि त्यांनी क्रांतिकारक भगत सिंह यांनाही शिक्षण दिले होते, असे पंतप्रधान म्हणाले.

अंगदानावर प्रकाश टाकताना त्यांनी मध्य प्रदेशच्या नर्मदापुरममधील शिवानी यांचे उदाहरण दिले. रस्ता अपघातात मृत्यू  झाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या अंगदानाच्या निर्णयामुळे समाजात एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. तसेच, देशात उभारण्यात आलेले १ लाख ९० हजार आयुष्मान आरोग्य मंदिर सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी वरदान ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाबमध्ये ‘खेती विरासत मिशन’ या संस्थेने मालवा क्षेत्रात कपासच्या प्राकृतिक शेतीला आणि पारंपरिक कृषी पद्धतींना पुनर्जीवित करण्यासाठी घेतलेल्या ‘नव-त्रिंजन’ या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.

डिचोलीत 'मन की बात'चे प्रसारण 

डिचोलीत आयोजित ‘मन की बात’च्या १३९ व्या भागाच्या प्रक्षेपणापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोलताना स्पष्ट केले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील दिग्गज, नवीन तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा आवर्जून उल्लेख करतात. हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम केवळ माहितीपूर्णच नाही, तर देशातील युवा पिढीसाठी आणि युवा नेतृत्वाखालील विकासासाठी अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. एप्रिल २०१४ मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग आपण कधीही न चुकता ऐकत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता आणि सामान्य जनतेच्या योगदानाला उजाळा देणारा आहे. कोकणी आणि मराठी भाषेत ‘मन की बात’वर आधारित लवकरच पुस्तके प्रसिद्ध केली जातील.  हा वैचारिक ठेवा आता थेट वाचक वर्गापर्यंत पोहोचणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.  



 ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारे तळागाळातील संदेश आणि विचार गोव्याच्या स्थानिक विकासात्मक उद्दिष्टांशी जोडण्यावर भर देण्यात आला. गेल्या १२ वर्षांपासून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी न चुकता प्रसारित होणारा हा कार्यक्रम देशवासीयांना थेट जोडणारा एक महत्त्वाचा पूल ठरला आहे. ‘विरासत आणि विकास’ या दोन्ही संकल्पनांना या कार्यक्रमात सातत्याने प्राधान्य मिळाले असून, देशाच्या कानाकोपऱ्यातील सांस्कृतिक विविधता, तरुणांना ड्रोन तंत्रज्ञानाचे शिक्षण, हाय-स्पीड ट्रेनमधील अनुभव आणि विविध स्टार्टअप्सच्या योगदानावर प्रकाश टाकला जातो. विशेषतः ‘मन की बात’मध्ये गोव्याशी संबंधित ५ ते ६ वेळा विविध विषयांची व घटनांची नोंद घेतली गेली आहे, ज्यामुळे गोव्यातील स्थानिक उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. परंपरागत पिकांच्या आणि खानपान संस्कृतीच्या विस्मरणावर चिंता व्यक्त करत गोव्यात पूर्वी उगवली जाणारी ज्योती, जया उकडा तांदूळ, चवळी, कुळीथ आणि उडीद यांसारखी पारंपरिक कडधान्ये व पिके काळाच्या ओघात मागे पडल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, ‘श्री अन्न’ किंवा मिलेट्सच्या माध्यमातून ही जुनी संस्कृती नवी पिढी अंगीकारत असून लुप्त होत चाललेल्या या पारंपरिक गोष्टींना नव्याने पुनरुजीवित करण्याची गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले. 

या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्याच्या प्रभारी डॉ. भारती पवार, खासदार सदानंद शेठ तानावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी सभापती राजेश पाटणेकर, मंडळ अध्यक्ष कौस्तुभ पाटणेकर तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी २०४७ पर्यंतच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत त्यांच्या विचारांचा व कार्याचा गौरव केला.   

हेही वाचा
सर्व पहा