मळकर्णे ग्रामसभेत ग्रामस्थांनी उठवला वीजपुरवठा, मोकाट जनावरे, अवैध बांधकामाचा मुद्दा

मळकर्णे ग्रामसभेत निकृष्ट केबल्समुळे होणारा वीज खंडित होण्याचा त्रास, वाढती अवैध बांधकामे, पाणीटंचाई आणि क्रीडा सुविधांच्या अभावावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
25th October, 04:03 pm
मळकर्णे ग्रामसभेत ग्रामस्थांनी उठवला वीजपुरवठा, मोकाट जनावरे, अवैध बांधकामाचा मुद्दा

केपे : मळकर्णे ग्रामपंचायतीची नुकतीच पार पडलेली ग्रामसभा विविध गंभीर समस्यांमुळे चांगलीच गाजली. या ग्रामसभेत प्रामुख्याने वीजपुरवठा, अनधिकृत बांधकामे, पाणीटंचाई, रानटी प्राण्यांचा व मोकाट जनावरांचा उपद्रव तसेच क्रीडा सुविधांचा अभाव यांसारखे महत्त्वाचे मुद्दे ग्रामस्थांनी आक्रमकपणे मांडले. ग्रामसभेत उपस्थित केलेल्या या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

ग्रामसभेत विजेच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा करताना नागरिकांनी सांगितले की, गावात बसवलेले एरियल बंच केबल आणि इतर केबल्स अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. वातावरणातील प्रचंड उष्णता आणि विजेचा ओव्हरफ्लो यामुळे हे केबल वारंवार गरम होऊन तुटतात, ज्यामुळे संपूर्ण गावात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या समस्येवर तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा अंडरग्राउंड केबलिंग किंवा चांगल्या दर्जाचे केबल्स बसवण्याची गरज असून, यासाठी संबंधित शासकीय विभाग आणि मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, गावातील वाढत्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दाही ग्रामसभेत प्रकर्षाने गाजला. उपलब्ध आकडेवारीनुसार गावाची मूळ लोकसंख्या केवळ दोन हजार नऊशेच्या आसपास असताना, बेकायदेशीर बांधकामामुळे बाहेरील लोक येऊन राहिल्याने ती थेट सहा हजारच्या घरात पोहोचली आहे. यामुळे स्थानिक पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत असून उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. याशिवाय, पिण्याच्या पाण्याच्या समस्येने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत असून, ज्या नागरिकांनी धरण प्रकल्पांसाठी आपल्या हक्काच्या जमिनी दिल्यात, त्यांनाच आज पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत व्यक्त करत यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.

रस्त्यावर आणि शेतात फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, अशा जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची आणि नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच, गावातील क्रीडा मैदान, फुटबॉल पिच आणि जिमच्या उपकरणांची दुर्दशा झाल्यामुळे तरुणांच्या क्रीडा विकासाला बाधा येत असल्याचे निदर्शनास आणले. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन क्रीडा मैदानाची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्याची माहिती ग्रामसभेत देण्यात आली.

हेही वाचा
सर्व पहा