मडगावातील प्रकल्प १५ डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याचा प्रयत्न : मंत्री राणे

मडगावात पझल पार्किंग व पालिका इमारत नूतनीकरणाची पायाभरणी करण्यात आली. १५ डिसेंबरपर्यंत प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री विश्वजीत राणे व पीडब्ल्यूडी मंत्री दिगंबर कामत यांनी दिले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
28 mins ago
मडगावातील प्रकल्प १५ डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याचा प्रयत्न : मंत्री राणे

मडगाव : पालिकेच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरलेलया मडगाव पालिका इमारत नूतनीकरण आणि बहुमजली पझल पार्किंग प्रकल्पाची पायाभरणी आरोग्य तथा नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मडगाव पालिका इमारतीतील नूतनीकरण केलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. याशिवाय पझल पार्किंग प्रकल्प व पालिका इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामांची पायाभरणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडतरी आमदार आलेक्स रेजिनाल्ड, प्रशासक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावळे व मुख्याधिकारी मधू नार्वेकर उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी आर्किटेक्ट मिलिंद रामाणी यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

शहरातील पार्किंगची समस्या आणि वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित बहुमजली पझल पार्किंग प्रकल्पाची पायाभरणी केली जाणार आहे. यासाठी सुमारे ७.७७ कोटींचा खर्च केला जाईल. यात ७४ कार व ३० दुचाकी राहण्याची सोय असेल. या कामासाठी सुमारे आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मंत्री राणे यांनी सांगितले की, मंत्री कामत यांच्या माध्यमातून मडगावातील झालेला विकास लोक विसरतात. आता ज्या सुविधा केलेल्या आहेत, त्याचे अपग्रेडेशन केले जात आहेत. मडगाव पालिका इमारतीला नाताळच्यावेळी रोषणाई केली जाईल. जिल्हाधिकारी इमारत, इस्पितळाची इमारत, १०८ रुग्णवाहिका ही मंत्री कामत यांच्याच कार्यकाळात झालेली आहे.

यावेळी आमदार रेजिनाल्ड यांनी सांगितले की, पार्किंग व वारसा इमारतीचे नूतनीकरण हे दोन्ही प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होते व आता हे मार्गी लागत आहेत. कामे करताना काही कमी राहिलेली असल्यास ती सुधारून पुढे जायची असते. प्रत्येक मतदारसंघात ५०० कोटींची कामे करण्याबाबत काहीजण प्रश्न करताना दिसतात. मतदारसंघात होणारी कामे करण्यासाठी आमदार प्रयत्न करत असतात, त्यामुळे त्याची दखलही घ्यावी. विरोधकांनी लोकांची दिशाभूल करू नये, असेही ते म्हणाले.

मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, मडगाव पालिकेच्या इतिहासातील हा ऐतिहासिक दिवस आहे. नगरनियोजन खात्याकडून सुमारे २० कोटींची कामे हाती घेण्यात येत आहेत. इस्पितळात दहा कोटी खर्चून एमआरआय मशीन, कार्डिओलॉजी सुविधा सुरू केलेली आहे. सात रुग्णवाहिका असून डिसेंबरपर्यंत जिल्हा इस्पितळाचा कायापालट करण्यात येईल, असे ते म्हणाले. ८.६१ कोटी खर्चून गॅसिफिकेशन प्रकल्प सोनसडोत तयार करण्यात आला. पालिका इमारतीचा कायापालट झाल्यानंतर ही राज्यातील उत्कृष्ट वारसा इमारत होईल. लिफ्टची सोय करून ही इमारत दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ अशी इमारत बनवावी, अशी मागणी केली.

मडगाव पालिका उद्यानाचे नूतनीकरण करावे, त्यासाठी १० कोटींची आवश्यकता आहे. ५ हजार चौमी जागा बांधकाम खात्याची आहे. दैवज्ञ भवननजीक स्पोर्टस एरिना तयार करून द्यावे. तर टीसीपीची जागा असून त्याठिकाणी पझल पार्किंगच्या प्रकल्पासाठी मंजुरी मिळावी, अशी मागणी मंत्री कामत यांनी केली. आयुष इस्पितळ पुढील महिन्यापर्यंत सुरू होईल. विकासकामे घेऊन लोकांसमोर गेल्यास आपण निवडणूक जिंकू शकतो, त्यासाठी जिल्हा इस्पितळातील सुविधांचे काम पूर्ण होण्याची गरज आहे. त्यामुळे इस्पितळाचे काम लवकर पूर्ण करून सर्व चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केली.

कोणताही प्रकल्प आल्यानंतर त्याला विरोध केला जातो, त्या व्यक्तींना मडगावचा विकास झालेला नको आहे. त्यामुळे अडथळे आणण्याचे काम करू नये, नव्या संकल्पना घेऊन पुढे यावे. कोमुनिदाद इमारतीवेळीही विरोध झाला पण सर्व सदस्यांनी कामांना मंजुरी दिली व ते काम पुढे नेण्यात येते. दिल्लीचे पक्ष काही गॅरंटी देतात पण उद्या हे पक्षच नाही होतील. त्यामुळे भाजप सरकारच लोकांचे काम करू शकते, असे मंत्री कामत म्हणाले.

मडगाव पालिकेतील लोकांच्या कामांच्या फाईल्स गहाळ करू नका, पालिकेतील माहिती बाहेर जाऊ देऊ नका. काही गोष्टी कानावर येत असून त्याबाबत नगरनियोजन मंत्र्यांकडे तक्रार केलेली नाही. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांना घरी बसण्याची वेळ येईल. फाईल्स गहाळ होण्याचे प्रकार घडल्यास पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात येईल. लोकांची कामे करण्यावर भर द्यावा, असे मंत्री कामत यांनी सांगितले.

राजकारणात वय हे महत्त्वाचे नाही तर काम करण्याची इच्छा असण्याची गरज आहे. विकासासाठी अनुभवी नेतृत्व गरजेचे असून नव्या नेतृत्वाला ते शक्य होणार नाही. त्यामुळे आगामी काळात मडगावसाठी दिगंबर कामत यांचेच नेतृत्व आवश्यक आहे, लोकांनी त्यांना साथ द्यावी. आपल्या वडिलांनी त्याकाळात विकासकामे केली म्हणून आजही ते निवडणुकीला उभे राहिल्यास निवडून येऊ शकतात, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

दिल्लीतून आलेले पक्ष पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. त्यांचे मोहल्ला क्लिनिक फेल झालेले आहे. केळशी पंचायतीला सायंकाळपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल. आपण पेपर वाचत नाही, समाजमाध्यमांवरही आपण सक्रिय नाही. केवळ जाहिरात केली म्हणून आमदार होता येत नाही. लोकांची कामे केल्यासच हे शक्य आहे. यापुढील सरकारही भाजपचेच येईल.

फिलीप्स कंपनीच्या सहकार्यातून कॅथलॅबची सुरुवात नाताळपूर्वी करण्यात येईल. ४० नव्या रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत. क्रिटिकेअर आयसीयूचे ५० कोटींचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. आजारी लोकांना घरात उपचार देण्याचे काम हाती घेतले असून १५०० लोकांना याचा लाभ सध्या मिळत असून ५० पंचायतींसह चार पालिका क्षेत्रात ही सुविधा दिली जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा