म्हापसा : पर्वरीच्या बाजूने नवीन मांडवी पुलावर भरधाव पर्यटक टॅक्सी कारने ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार ठोकर दिली. या भीषण अपघातात कुशाग्र पटाले (२१, रा. मूळ मुंबई) व यश मलिक (२०, रा. मूळ हरियाणा) दोघे विद्यार्थी जागीच ठार. मयत युवक हे सांकवाळ - मुरगाव येथील एका कायदा महाविद्यालयात शिक्षण घेत होते.
हा भीषण अपघात सोमवारी पहाटे सुमारे ३.११ वाजण्याच्या सुमारास घडला. मयत युवक सांगोल्डाहून पणजीच्या दिशेने 'एमएच ०३ डीझेड ९६५१' क्रमांकाच्या ट्रम्प मोटरसायकलवरून जात होते. त्याच वेळी संशयित चालक राजकुमार कट्टिमणी (रा. मूळ कर्नाटक) हा 'जीए ०३ व्ही २५३८' क्रमांकाची अर्टिगा पर्यटक टॅक्सी घेऊन दोन प्रवाशांसह पणजीहून पर्वरीच्या दिशेने जात होता. मांडवी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात टॅक्सी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला अत्यंत भीषण धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दोघेही तरुण जबर जखमी होऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सीताराम मळीक आणि हवालदार विवेक दिवकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व संशयित टॅक्सी चालकाला ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेह पुढील तपास व शवविच्छेदनासाठी गोमेकॉच्या शवाघरात पाठवण्यात आले आहेत.
दुसऱ्या एका घटनेत, गोवा वेल्हा येथे लष्करी वाहन आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात मितेश मोहन शेट (वय २२, रा. गिरी) या दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.


