सुलतानपूर : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ताफ्यातील पाच गाड्या आणि एका रुग्णवाहिकेची परस्पर धडक होऊन अपघात झाल्याची घटना सोमवारी पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर घडली. या अपघातात काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षक जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, राहुल गांधी या अपघातातून सुरक्षित बचावले आहेत.
दिल्लीहून उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे जात असताना एक्स्प्रेसवेवरील ९१ व्या किलोमीटरच्या मैलाच्या दगडाजवळ हा अपघात झाला. राहुल गांधी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त विधानाशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात सुलतानपूर येथील खासदार-आमदार न्यायालयात (एमपी-एमएलए कोर्ट) हजर राहण्यासाठी जात होते.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
न्यायालयात आज सुनावणीची शक्यता
मानहानीच्या या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधी यांना वैयक्तिकरीत्या हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात न्यायालयाकडून निर्णय सुनावला जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सुलतानपूर दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सुलतानपूरमध्ये स्वागताची तयारी
राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सुलतानपूर शहरात आठ ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी तयारी केली होती. न्यायालयाबाहेर तसेच परिसरातील रस्त्यांवर ‘सत्यमेव जयते’ असे संदेश असलेले फलक लावण्यात आले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आराधना मिश्रा मोना यांनी लखनऊ येथे राहुल गांधी यांचे स्वागत केले. राहुल गांधी विमानाने लखनऊ येथे पोहोचल्यानंतर रस्तेमार्गे सुलतानपूरकडे रवाना झाले. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे आराधना मिश्रा यांनी यावेळी सांगितले.


