पणजी : उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय (असिलो) (North Goa District Hospital) येथे राज्यातल्या शासकीय रुग्णालयातील पहिली 'एआय-सहाय्यित' टोटल नी रिप्लेसमेंट (गुडघा रोपण) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा मुंज, डॉ. विकास सोलेकर, डॉ. प्रभाव देसाई, डॉ. दिव्या पै आणि संपूर्ण ऑपरेशन थिएटर टीमने मोलाची भूमिका बजावली. राज्यात परवडणारी, सुलभ आणि तंत्रज्ञान-आधारित आरोग्यसेवा देण्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
याबाबत आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन, गोव्याने सर्वसामान्यांपर्यंत आधुनिक आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारी रुग्णालयात एआयच्या सहाय्याने गुडघा रोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणे हा राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
ही कामगिरी शक्य करून दाखवणाऱ्या सर्व डॉक्टरांचे अभिनंदन. सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि प्रत्येक गोमंतकीयांपर्यंत उच्च दर्जाची आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी 'गोवा मॉडेल ऑफ हेल्थकेअर' कशा प्रकारे कार्य करत आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. याआधी देखील राज्यातील विविध सरकारी रुग्णालयात एआयचा यशस्वीपणे वापर झाला आहे.
डिजिटल माध्यमातून तपासले १ लाखाहून अधिक छातीचे एक्स-रे
राज्य सरकारने अत्याधुनिक उपक्रमांतर्गत डिजिटल माध्यमातून एक लाखांहून अधिक छातीचे एक्स-रे तपासले आहेत. यामध्ये देखील एआयचा वापर करण्यात आला होता. यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान वेगाने करणे शक्य झाले आहे. प्रगत स्क्रिनिंग अल्गोरिदमच्या वापरामुळे सार्वजनिक आरोग्य केंद्रांनी विविध आजार वेळेत ओळखले आहेत. ज्यामुळे निदानाचा वेळ निम्म्याहून अधिक कमी झाला आहे.
तंत्रज्ञान-आधारित सार्वजनिक आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आघाडीवर
निदानापलीकडे जाऊन आता ऑर्थोपेडिक्स सारख्या शस्त्रक्रिया विभागांमध्येही एआयचा वापर सुरू झाला आहे. यामुळे गोवा तंत्रज्ञान-आधारित सार्वजनिक आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आघाडीवर आला आहे.
सरकारी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा वापर सुरू झाल्यामुळे, उच्च दर्जाच्या आणि अचूक वैद्यकीय शस्त्रक्रिया आता केवळ महागड्या खासगी रुग्णालयांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. तर त्या प्रत्येक गोमंतकीयासाठी सुलभ झाल्या आहेत.


