पणजी : राज्यातील जनतेला स्मार्ट मीटर (Smart Meter) नको आहेत. सध्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे सरकारने स्मार्ट मीटर जोडणी तात्पुरती बंद ठेवली आहे. भविष्यात ती पुन्हा सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे सरकारने घरगुती ग्राहकांची प्रीपेड स्मार्ट मीटर जोडणी कायमस्वरूपी रद्द करणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही सरकारला पंधरा दिवसांची मुदत देत आहोत. यानंतर वीज खात्यासमोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अमित पाटकर यांनी दिला.
सोमवारी त्यांनी याबाबत खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. पाटकर यांनी सांगितले की, सरकारने स्मार्ट मीटर जोडणी थांबवली असल्याचे सांगितले आहे. मात्र नवीन जोडणी देताना,नवीन बांधकाम केल्यास किंवा जुने मीटर खराब झाल्यास ते बदलून स्मार्ट मीटर जोडण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर मुळे लोकांना दहा पट अधिक वीज बिल येत आहे. यामुळे लोकांना असे मीटर नको आहेत. तरी देखील सरकार आडमार्गाने स्मार्ट मीटर बसवत आहे. सरकारने उद्योग किंवा अन्य क्षेत्रातील ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवावे. मात्र घरगुती ग्राहकांवर सक्ती करू नये.
ते म्हणाले, मुळात सरकारला वीज खात्याचे खाजगीकरण करायचे आहे. जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवून नंतर वीज खाते एका खाजगी उद्योगपतीच्या घशात घालण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या एक मोठा उद्योगपती गोव्यातील वीज वितरण आपल्या हातात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे झाल्यास तो उद्योगपती ठरवेल त्या दराने वीज शुल्क भरावे लागेल.
मात्र आम्ही असे होऊ देणार नाही. स्मार्ट मीटर बाबत काही दिवसांपूर्वी मानवाधिकार आयोगाने एक निर्णय दिला आहे. मात्र याचा चुकीचा अर्थ लावू नये असे आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
सध्या राज्य सरकारतर्फे सरकार तुमच्या दारी उपक्रम राबवला जात आहे. वास्तविक प्रशासन अपयशी ठरल्याने सरकारला लोकांच्या दारी जावे लागत आहे. हा इवेंट देखील एक राजकीय इव्हेंट आहे. येथे भाजपच्या कार्यकर्त्यांना बोलावले जाते. राज्यभरात म्युटेशनची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र सरकार विशेष शिबिरे घेतल्याचे दाखवत लोकांना फसवत आहे. बेरोजगारी, महागाईमुळे सामान्य जनता आधीच त्रस्त झाली आहे. अशातच स्मार्ट मीटर आल्यास लोकांचे आणखी हाल होणार आहेत असे पाटकर यांनी सांगितले.
घरगुती स्मार्ट मीटर जोडणी तात्पुरती बंद : मुख्य अभियंता
वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर घरगुती वीज ग्राहकांची स्मार्ट मीटर जोडणी तात्पुरती बंद केली आहे. असे असूनही काही लोक हाच विषय घेऊन वारंवार खात्यामध्ये का येतात हे मला माहिती नाही. याप्रकरणी मी सध्या अधिक काही बोलू शकत नाही.


