गोव्यात आणल्या जाणाऱ्या कोंबड्यांना फिटनेस प्रमाणपत्र सक्तीचे!

गोव्यात जिवंत पोल्ट्री पक्ष्यांची सुरक्षित आणि कायदेशीर वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. आरोग्य प्रमाणपत्र आणि कागदपत्रे नसलेल्या पोल्ट्री वाहनांना राज्यात प्रवेश मिळणार नाही.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
28 mins ago
गोव्यात आणल्या जाणाऱ्या कोंबड्यांना फिटनेस प्रमाणपत्र सक्तीचे!

पणजी : गोव्यात पोल्ट्री (कोंबडी) वाहतूक अधिक सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन खात्यातर्फे एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 'मुख्यमंत्री स्वयंपूर्ण गोवा पोल्ट्री विकास धोरण २०२५' अंतर्गत अन्न सुरक्षा, ग्रामीण समृद्धी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने हे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या प्राण्यांमधील क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६०, प्राण्यांच्या वाहतुकीचे नियम २००१ आणि केंद्रीय मोटार वाहन नियमावलीनुसार ही नवी नियमावली तयार करण्यात आली आहे.   

या नवीन अधिसूचनेनुसार, गोव्यामध्ये किंवा गोव्याच्या हद्दीत पोल्ट्री पक्ष्यांची वाहतूक करताना प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या वाहतूकविषयक सर्व लागू नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. राज्याबाहेरून किंवा राज्यातून अन्यत्र जिवंत पोल्ट्री पक्ष्यांची वाहतूक करताना, पक्ष्यांचे स्रोत, त्यांची तंदुरुस्ती आणि आरोग्याची स्थिती प्रमाणित करणारे सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिकृत प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. तसेच, वाहन चालवणारे किंवा वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांनी सर्व कायदेशीर परवाने, कागदपत्रे आणि नोंदी सोबत ठेवणे बंधनकारक असून, मागणी केल्यास ती सक्षम अधिकाऱ्यांसमोर तपासणीसाठी सादर करावी लागतील.   

पोल्ट्री पक्ष्यांची वाहतूक करताना त्यांची सुरक्षा, कल्याण आणि मानवी हाताळणी होईल याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. पक्ष्यांची गर्दी होणार नाही, त्यांना दुखापत किंवा त्रास होणार नाही तसेच आजार पसरण्याचा धोका टळेल अशा प्रकारे वाहतूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वरील नियमांचे किंवा अटींचे पालन न केल्यास संबंधित पोल्ट्री वाहनांना गोव्याच्या हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. ही अधिसूचना जारी झाल्यापासून त्वरित प्रभावाने लागू करण्यात आली असून, पशुसंवर्धन खात्याचे संचालक तथा सहसचिव डॉ. नितीन नाईक यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.   

हेही वाचा
सर्व पहा