मडगाव : राय येथील सांतेमळ परिसरात चालणाऱ्या एका कथित बेकायदा कत्तलखान्यावर दक्षिण गोवा जिल्हा प्राणी क्रुरता प्रतिबंधक सोसायटी (डीएसपीसीए) आणि मायना कुडतरी पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. या धडक कारवाईत ताज्या गोमांसासह त्यापासून तयार केलेल्या चरबीचे ३० हून अधिक डबे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी जागेचा मालक आणि संशयित हैदर बेपारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी गोमांसापासून चरबी वेगळी करून ती डब्यांमध्ये साठवण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे यापूर्वीही या ठिकाणी दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. तरीही तेथे पुन्हा असाच बेकायदा प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याने स्थानिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच जप्त पदार्थांचा संभाव्य वापर आणि निर्मितीबाबत सखोल तपास करावा, अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. वारंवार कारवाया होऊनही असा प्रकार पुन्हा कसा सुरू राहिला, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. मायना कुडतरी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.


