पणजी : मानवाधिकार आयोगाने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची पाहणी केली. यादरम्यान कैद्यांच्या राहणीमानाचा दर्जा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. आयोगाने येथील विविध गैरसोयींवर ताशेरे ओढले आहेत. याबाबत आयोगाने विविध शिफारसी केल्या आहेत. याबाबत केलेल्या कृतीचा अहवाल कारागृह महानिरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला २३ डिसेंबर २०२६ पूर्वी सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
आयोगाने निरीक्षण नोंदवले की, काही कोठड्यांमध्ये दोन कच्चे कैदी ठेवण्यास परवानगी असताना देखील येथे तीन कैदी ठेवण्यात आले आहेत. यामुळे येथे व्हेंटिलेशन व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आयोगाने कच्च्या कैद्यांना मुबलक जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. येथील ओव्हरहेड टाकीची आवश्यक दुरुस्ती करणे, येथे पीडब्ल्यूडीच्या कनिष्ठ अभियंत्याची कायमस्वरूपी नियुक्ती करणे, कैद्यांना मच्छरदाण्या पुरवणे, सांडपाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे अशा शिफारसी आयोगाने केल्या आहेत.
आयोगाच्या निदर्शनास आले की येथे ७०० कैद्यांसाठी केवळ एकच फ्रिज उपलब्ध आहे. अन्न चांगले राहण्यासाठी आयोगाने येथे आणखी एक फ्रीज उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. सर्व कैद्यांना वेळेत वैद्यकीय उपचार व सुविधा पुरवणे, येथे येणाऱ्या आयपीएचबी मधील डॉक्टरांची वारंवारता वाढवणे, कारागृहाच्या रुग्णालय ब्लॉक मधील रिक्त जागा भरणे, स्वयंपाकगृहात एक्झॉस्ट फॅन लावणे, वॉटर प्युरिफायरची वेळोवेळी देखभाल करणे, कैद्यांना लागणारी अंडी व केळे एकदम खरेदी न करता पंधरा दिवसातून एकदा खरेदी करणे अशा विविध शिफारसी आयोगाने केल्या आहेत.
जामीन मिळूनही तुरुंगात
आयोगाच्या निदर्शनास आले की, न्यायालयाने जामीन देऊन देखील १९ कैदी अद्याप तुरुंगातच आहेत. जामिनाची सुरक्षा रक्कम न भरल्याने हे कैदी तुरुंगात असल्याचे आयोगाला समजले. याविषयी आयोग दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा आणि सत्र न्यायालयांच्या न्यायाधीशांना पत्र लिहिणार आहे. याप्रकरणी सहानुभूतीने विचार करण्याची विनंती आयोगातर्फे करण्यात येणार आहे.
४५ दिवस औषधे दिली नाहीत
आयोगाने पाहणी दरम्यान एका महिला कैद्याशी संवाद साधला. त्या महिलेने आपल्याला अझिलो रुग्णालयातील डॉक्टरांनी औषधे लिहून दिली असल्याचे सांगितले. मात्र ४५ दिवस झाले तरी अद्याप ही औषधे पुरवण्यात न आल्याची तक्रार तिने केली. आयोगाने या महिलेला तसेच अन्य सर्व कैद्यांना वेळेत औषधे पुरवण्याचे निर्देश दिले.


