वाडे-कुर्डीत पती-पत्नीची आत्महत्या; परिसरात शोककळा

सांगे तालुक्यातील वाडे-कुर्डी येथे वादातून पत्नीने गळफास घेतल्यावर पतीनेही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. उपचारादरम्यान पतीचाही मृत्यू झाला असून, अपत्य नसलेल्या या दाम्पत्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
वाडे-कुर्डीत पती-पत्नीची आत्महत्या; परिसरात शोककळा

सांगे : सांगे तालुक्यातील वाडे-कुर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील धनगरवाडा येथे पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. भारती जानू झोरे (३०) आणि जानू चिमणो झोरे (३९) अशी मृतांची नावे आहेत. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही गळफास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता भारती आणि जानू यांच्यात तोंडी वाद झाला होता. त्यानंतर भारती यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. काही वेळाने त्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. पत्नीने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर जानू यांनीही घराशेजारील गोठ्यात गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जानू यांनी गळफास घेतल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ खाली उतरवले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून अधिक उपचारांसाठी त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी रात्री सुमारे ११.१५ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या दाम्पत्याला अपत्य नव्हते, अशी माहिती मिळाली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या कथित वादानंतर ही घटना घडली असली, तरी दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागील नेमक्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच संबंधितांकडून घटनेचा तपशील जाणून घेतला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बोरकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

रविवारी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वाडे-धनगरवाडा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील पती-पत्नीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा
सर्व पहा