मडगाव : अस्वच्छता दिसल्यानंतर नाक मुरडून पुढे जाणार्यांच्या यादीत न येता स्वतःला जबाबदार मानत शेळवण कुडचडेतील विश्वेश देसाई या युवकाने खारफुटी स्वच्छतेचा वसा हाती घेतला आहे. स्वखर्चातून आतापर्यंत सुमारे अडीच किलोमीटरच्या नदीपात्रात सुमारे पाच टन प्लास्टिक व इतर कचरा त्यांनी गोळा करत नदी स्वच्छतेचा एक आदर्श घालून दिलेला आहे. यापुढील काळात ही चळवळ आणखी वाढावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ घोषणाबाजी करून राज्य सरकारच्या भरवशावर न राहता स्वतःहून त्यासाठी पुढाकार घेतल्यास बदल घडतो, हे विश्वेश देसाई यांनी दाखवून दिले आहे. पृथ्वी डेव्हलपर्स या फर्मचे मालक व सामाजिक कार्यकर्ते यांनी दक्षिण गोव्यातील काराय, शिरोडा भागातील जुवारी नदीपात्राच्या खारफुटी परिसरात स्वखर्चाने स्वच्छता मोहीम राबवून सुमारे पाच हजार किलो कचरा खारफुटीभागातून बाहेर काढला आहे.

साधारणत: चार महिन्यापूर्वी मित्रांसमवेत मासेमारीसाठी गेलेल्या विश्वेश यांना खारफुटीच्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे दिसून आले. त्यावेळी मित्रांसमवेत झालेल्या चर्चेतूनच हा कचरा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल त्यांनी टाकले. पहिल्या दिवशी सुमारे चाळीस पिशव्या कचरा गोळा केल्यानंतर हे काम अर्धवट न सोडता पुढे नेण्याचा निश्चय त्यांनी केला. नदीला ओहोटी लागल्यानंतर खारफुटी भागात जात सफाई केली जाते तर भरतीवेळी किनार्यावर येत गोळा केलेल्या कचर्याचे वर्गीकरण केले जाते. खारफुटी न तोडता काम करायचे असल्याने मशिनचा वापर टाळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता पडते. खर्चासह मनुष्यबळाचीही आवश्यकता या कामासाठी लागते. मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासह सरकारकडूनही सहकार्याचे आश्वासन मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच सत्कार झालेला असून मुख्यमंत्र्यांना आगामी काळातील पाच किमी अंतरातील स्वच्छतेसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. सरकारकडून आर्थिक मदत मिळाल्यास कामाला वेग येईल आणि पुढील काळात बोरी पूल ते कुडचडे पुलापर्यंतच्या नदीपात्रात स्वच्छतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

खारफुटीतून कचरा गोळा करण्याचे काम दिसते तेवढे सोपे नाही. बोटीतून जाऊन कचरा गोळा करताना चिखलात रुतण्याचा धोकाही असतो. याशिवाय मगर व इतर जलचर प्राण्यांच्या धोक्याला सामोरे जावे लागते, असेही विश्वेश सांगतात. नद्यांमुळे मनुष्याचे जीवन सुरू असून याच्या स्वच्छतेसाठी स्वतःला जबाबदार धरत स्वच्छता मोहीम सुरू व्हावी. नदीपात्रासह आजूबाजूला कचरा टाकण्यात येऊ नये यासाठी जनचळवळ आवश्यक आहे. आता स्वच्छतेची जबाबदारी सरकारवर न ढकलता ती आपणच केली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. जुवारी नदी काठावरील खारफुटी परिसराला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आल्याचे विदारक चित्र पाहून विश्वेश देसाई यांनी कोणत्याही सरकारी किंवा इतर मदतीची वाट न पाहता, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून ही मोहीम हाती घेतली. त्यांनी आपल्या कामगारांच्या मदतीने सलग अडीच महिना मेहनत घेऊन तब्बल अडीच किलोमीटर नदीचा आणि खारफुटीचा परिसर पूर्णपणे कचरामुक्त केला. यासाठी आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या खिशातून साडेसात लाखांचा खर्च केल्याचे ते सांगतात.

या मोहिमेदरम्यान गोळा केलेल्या कचर्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या व काचेच्या बाटल्या, जुने कपडे, ट्यूबलाईट, टीव्ही आणि इंजेक्शनच्या सिरींजसारखा मेडिकल वेस्टही सापडून आला. हा सर्व कचरा गोळा केल्यानंतर त्याचे वर्गीकरण केले जाते. हा गोळा केलेला कचरा एकाठिकाणी साठवून ठेवण्यात आलेला असून पुढील विल्हेवाटीसाठी गोवा घनकचरा व्यवस्थापनाकडे सोपवण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. प्रत्येकाने नदीकिनारी कचरा टाकताना विचार केला पाहिजे, तरच हा प्रश्न सुटणार आहे. जागृतीसाठी गावातील महाविद्यालयांसोबत चर्चा केलेली असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेत माहिती देण्यात येईल. याशिवाय वकील संघटनांनीही या मोहिमेत सहभागाची रुची दाखवलेली आहे. जनतेचा सहभाग आता वाढत असल्याने मोहिमेला यश निश्चितच येईल, असा विश्वास विश्वेश देसाई यांनी व्यक्त केला आहे.


