ड्रग्स विरोधी परिपत्रकावरून लोकांची दिशाभूल करू नये : मुख्यमंत्री

केंद्रीय गृह खाते, एनसीबीच्या निर्देशानुसारच शिक्षण खात्याने ड्रग्स विरोधी परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक ड्रग्स विरोधात जागृती करण्यासाठी आहे. याचा चुकीचा अर्थ काढून लोकांची दिशाभूल करू नये. तसेच गोव्याचे अथवा भाजपचे नाव बदनाम करू नये. असले प्रकार सहन करून घेतले जाणार नाहीत. शिक्षण संस्थांनी शाळा परिसरात ड्रग्ज विरोधात जागरूक राहणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
53 mins ago
ड्रग्स विरोधी परिपत्रकावरून लोकांची दिशाभूल करू नये : मुख्यमंत्री

पणजी : केंद्रीय गृह खाते, एनसीबीच्या निर्देशानुसारच शिक्षण खात्याने ड्रग्स विरोधी परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक ड्रग्स विरोधात जागृती करण्यासाठी आहे. याचा चुकीचा अर्थ काढून लोकांची दिशाभूल करू नये. तसेच गोव्याचे अथवा भाजपचे नाव बदनाम करू नये.  असले प्रकार सहन करून घेतले जाणार नाहीत. शिक्षण संस्थांनी शाळा परिसरात ड्रग्ज विरोधात जागरूक राहणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

शुक्रवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षण खात्याचे परिपत्रक ड्रग्स विरोधी जागृती करण्यासाठी आहे. कुणीही परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावू नये. शाळा परिसराच्या ५०० मीटर बाहेरील अंतरावर ड्रग्स विक्रीला परवानगी आहे असा याचा अर्थ होत नाही. हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. हा आदेश केवळ गोव्यातच नव्हे तर सर्व राज्यात लागू करण्यात आला आहे. कुणीही परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून अनावश्यक प्रचार करू नये. मागील काही वर्षांत सरकारने ड्रग्स विरोधी कारवाई कडक केली आहे. पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक चांगले काम करत आहे. 

ते म्हणाले, अमली पदार्थ विरोधी पथक गावोगावी जाऊन तपासणी करत आहे. कुणावरही संशय असल्यास त्याला लगेच ताब्यात घेतले जात आहे. मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री म्हणून मी गोव्यात ड्रग्सला कसलाही थारा दिलेला नाही. यापुढेही ड्रग्स विरोधात कडक कारवाई सुरूच राहील. शिक्षण संस्थांनी आपल्या परिसरात कोण बाहेरील संशयास्पद व्यक्ती येत आहे का, ती व्यक्ती काय करत आहे, त्याच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. ड्रग्स विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम पोलिसांचेच आहे. 

केंद्रीय संस्थेच्या सूचनेवरून परिपत्रक : शिक्षण संचालक झिंगडे 

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की, राज्यात शाळा परिसरात ड्रग्स वापराबाबत शिक्षण खात्याकडे एकही तक्रार आलेली नाही. केंद्रीय संस्थेने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना असे परिपत्रक काढण्याची सूचना केली होती. याआधी शाळा परिसरात २०० मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थांवर बंदीचे परिपत्रक काढण्यात आले होते.

याच धर्तीवर हे ड्रग्सविरोधी परिपत्रक काढले आहे. ड्रग्स विक्री रोखण्याचे काम शिक्षण संस्था, शाळा प्रमुखांचे नाही. परिपत्रकानुसार, शिक्षण संस्थांनी शाळांमध्ये ड्रग्ज विरोधी जागृती करणे, नो ड्रग्ज झोन असे बोर्ड लावणे आवश्यक असल्याची त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा
सर्व पहा