नेसाय येथे एफडीएची धडक कारवाई; अस्वच्छ वातावरणात बनवलेले २३ हजार रुपयांचे लाडू केले नष्ट

नेसाय येथील सां जुझे द अरियाल औद्योगिक वसाहतीत अस्वच्छ वातावरणात आणि एफएसएसएआय परवान्याशिवाय बनवले जाणारे २३ हजार २२० रुपये किमतीचे १०५ किलो मोतीचूर लाडू अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
48 mins ago
नेसाय येथे एफडीएची धडक कारवाई; अस्वच्छ वातावरणात बनवलेले २३ हजार रुपयांचे लाडू केले नष्ट

मडगाव : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि विक्रीवर कडक लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत दक्षिण गोवा एफडीएच्या पथकाने नेसाय येथील सां जुझे द अरियाल औद्योगिक वसाहतीत धाड टाकून विनापरवाना आणि अस्वच्छ वातावरणात चालणाऱ्या एका मिठाई कारखान्यावर धडक कारवाई केली. या वेळी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुमारे २३ हजार २२० रुपये किमतीचे १०५ किलो मोतीचूर लाडू जप्त करून जागीच नष्ट केले.

आंतरराज्य बसमधून होणारी खाद्यपदार्थांची अवैध वाहतूक तसेच सणांच्या काळात होणारी भेसळ रोखण्यासाठी २७ ऑगस्ट रोजी एफडीएने ही विशेष मोहीम राबवली. नेसाय औद्योगिक वसाहतीतील संबंधित कारखान्याची अचानक पाहणी केली असता, तेथे आवश्यक असलेला 'एफएसएसएआय' (FSSAI) परवाना न घेताच मिठाईचे मोठे उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय, उत्पादन परिसरात स्वच्छतेच्या मूलभूत नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. अशा दूषित आणि अस्वच्छ वातावरणात तयार केलेल्या मिठाईमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी १०५ किलो लाडवांचा साठा ताब्यात घेऊन तात्काळ नष्ट केला.

सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि दक्षिण गोवा पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी माधव के., प्रिया डी., अन्न सुरक्षा अधिकारी अभिषेक एन., अमरदीप जी., प्रिया के. यांच्यासह एमटीएस कर्मचारी गौरेश जी. आणि राम जी. सहभागी झाले होते. आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि अस्वच्छ पद्धतीने विनापरवाना खाद्यपदार्थ बनवणाऱ्या आस्थापनांविरोधात संपूर्ण गोव्यात अशीच कठोर कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचा
सर्व पहा