मडगाव: दक्षिण गोव्यातील नुवे बायपासनजीक दुचाकी चोरीच्या संशयावरून एका अनोळखी तरुणाला पकडून जमावाने बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना अटक केली असून भारतीय न्याय संहितेअंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० या कालावधीत सासष्टी तालुक्यातील सुरावली-कोलवा परिसरातून एक बुलेट दुचाकी चोरीला गेली होती. या चोरीचा संशय घेऊन काही स्थानिकांनी नुवे बायपास परिसरात एका अंदाजे ३० वर्षीय अनोळखी तरुणाला अडवले. पाहता पाहता त्या ठिकाणी २५ हून अधिक लोकांचा जमाव एकत्र आला आणि त्यांनी संशयित तरुणाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणाला मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे.
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन संशयितांना अटक केली आहे, तसेच चोरीला गेलेली बुलेट दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयितांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०३(१), १८९(२), १८९(३) आणि १९० अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारहाणीत सहभागी असलेल्या इतर आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत.
मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट व्हावे यासाठी मृतदेह फॉरेन्सिक तपासणी व शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे कडक आवाहन केले आहे. कोणताही संशयास्पद प्रकार किंवा व्यक्ती आढळल्यास स्वतः कारवाई न करता तात्काळ ११२ या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.


