कपभर चहाचा गोडवाही झाला महाग! कामगारवर्गाचे दैनंदिनी बजेट कोलमडले

साखरेसह दूध, गॅस आणि चहा पावडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गोव्यात शहरी भागांतील उपहारगृहांत चहाचे दर १०-१५ रुपयांवरून थेट २०-२५ रुपयांपर्यंत वाढले असून महागाईचा चटका चहाप्रेमींच्या खिशाला बसत आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
50 mins ago
कपभर चहाचा गोडवाही झाला महाग! कामगारवर्गाचे दैनंदिनी बजेट कोलमडले

पणजी : सकाळची आळस घालवणारी सुरुवात असो किंवा दुपारचा थकवा पळवणारी ५ मिनिटांची विश्रांती... हातात वाफाळलेल्या चहाचा कप आला की थांबलेल्या दिवसाला एकदम नवा जोश मिळतो! मित्रांशी गप्पा मारताना, चालू घडामोडींवर तावातावाने चर्चा करताना किंवा अभ्यासाच्या टेन्शनमधून ब्रेक घेताना चहाचा एक भुरका म्हणजे गोवेकरांचा प्राणवायूच. पण आता याच वाफाळत्या कपातील गोडव्याला महागाईचा असा काही कडवट चटका बसला आहे की, चहाप्रेमींच्या खिशाला थेट भगदाड पडू लागले आहे.

साखरेच्या किमतींनी मारलेली उसळी आता चहाच्या टपऱ्या आणि उपाहारगृहांपर्यंत पोहोचली आहे. चहाच्या एका कपात टाकली जाणारी साखर तशी चिमूटभरच असते; पण दिवसभरात रिकामे होणारे शेकडो कप आणि हजारो घोट यांचा ताळेबंद मांडताना उपहारगृह चालकांची गणिते जुळणे कठीण झाले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत दूध, चहा पावडर आणि व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरांत झालेली छुपी वाढ यामुळे चहा विक्रेत्यांसमोर दर वाढवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.

पणजी, म्हापसा, फोंडा, मडगाव यांसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागांत नोकरी करणारे तरुण, आयटी आणि सरकारी  कार्यालयांतील कर्मचारी आणि व्यापाऱ्यांची सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत उपहारगृहांत एकच गर्दी असते. दोन दिवसांपूर्वीपर्यंत ज्या चहासाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत होते, तोच कप आता थेट २०-२५ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. काही ठिकाणी 'स्पेशल चहा'च्या दरांत ५ रुपयांची थेट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 'एक कप चहा आणि खूप साऱ्या गप्पा' हा आवडता छंद आता जरा विचार करूनच जपावा लागणार, असेच चित्र सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा
सर्व पहा