कोरगाव : पेडणे तालुक्यातील वारखंड ग्रामपंचायतीजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वन खात्याच्या पेडणे विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत खैरीच्या लाकडाचे तब्बल ५२ ओंडके जप्त केले. वन खात्याच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात खैरीच्या लाकडाची बेकायदेशीर तोड आणि अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पेडणे रेंज फॉरेस्ट ऑफिसच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या पथकात आरएफओ हरीश महाले, आरएफ सुनील नाईक आणि फॉरेस्ट गार्ड स्नेहल साळगावकर यांचा समावेश होता. गुप्त माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाकडाची ही अवैध वाहतूक जागीच रोखली.
या प्रकरणात सोनू शेलके (रा. निर्वडे, सावंतवाडी) याचे नाव समोर आले असून वन खात्याने त्याच्याविरोधात वन कायद्यांतर्गत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ५२ खैरीच्या लाकडाच्या ओंडक्यांची वन विभागाच्या तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. तसेच, खैर लाकडाच्या बेकायदेशीर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले मारुती ओम्नी हे चारचाकी वाहनही वन विभागाने घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.


