पणजी : ताळगाव चर्चजवळ पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोघा चोरट्यांना पणजी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ३.५ लाख रुपये किमतीचे १० चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाराम कुमार (रा. दुर्गावाडी, ताळगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदार शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता ताळगाव चर्चजवळून चालत जात असताना काळी हुडी घातलेल्या आणि काळ्या अप्रिलिया स्कूटरवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील गुलाबी रंगाचा ओप्पो मोबाईल (१५ हजार रु. किमतीचा) हिसकावून पोबारा केला होता.
याप्रकरणी पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर, हवालदार समीर नाईक, काॅन्स्टेबल इर्मिया गुरैया बालभद्र, प्रथमेश मळीक, मिनेश नाईक, सुरेश नाईक प्रसन्ना मंगेशकर आणि चालक विकास नाईक यांचे पथक तयार करून तपास सुरू केला. याच दरम्यान पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रेहान रझा मुल्ला (१९, रा. इंदिरा नगर, चिंबल) याला प्रथम अटक केली. त्याच्याकडून ६ मोबाईल जप्त केले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याने काही मोबाईल कासिमसाब बिजापूर (२४, रा. इंदिरा नगर, चिंबल) याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कासिमसाब यालाही अटक करून त्याच्याकडून आणखी ४ मोबाईल जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या १० मोबाईलची किमत ३.५ लाख रुपये आहेत.
याप्रकरणी पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर पुढील तपास करत आहेत.


