पणजी : इतर मागासवर्गीय (ओबीसी) दाखला मिळवण्यासाठी वडिलांचा बनावट जन्म दाखला सादर केल्याप्रकरणी म्हापशाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर यांच्याविरोधात गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, जमिनीच्या खोट्या विक्री करारप्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना आधीच अटक झाली असून, सध्या हे दोन्ही प्रकरणे चर्चेत आहेत.
गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सिस्को कार्व्हालो यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तारक आरोलकर यांनी आपण ओबीसी भंडारी नाईक समाजाचे असल्याचा दावा करत बार्देशच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यानुसार १८ मार्च २०२१ रोजी त्यांना ओबीसी प्रमाणपत्र जारी करण्यात आले. मात्र, यासाठी त्यांनी आपले वडील मंगेश अनंत आरोलकर यांचा १५ एप्रिल १९७४ रोजी जारी झालेला बनावट जन्म दाखला सादर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक मंगेश वळवईकर यांनी तारक आरोलकर यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ४२०, ४६५, ४६८ आणि ४७१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याखाली आरोलकर यांनी मेरशी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून, या प्रकरणाची सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार आहे.
जमीन फसवणूक प्रकरणात अटक
दुसऱ्या एका प्रकरणात, आसगाव येथील जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवून बनावट विक्री कराराद्वारे दिल्लीतील पंकज बजाज यांची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा शाखेने तारक आरोलकर यांना अटक केली आहे. या प्रकरणी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातही त्यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी २९ ऑगस्ट रोजी झाली आहे. एकापाठोपाठ एक गंभीर आरोप समोर आल्याने माजी नगरसेवक आरोलकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


