जीएमसीत उंदरांचा धुमाकूळ; शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णाचा पाय कुरतडला

गोमेकॉच्या वॉर्ड क्रमांक १११ मध्ये उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा पाय उंदराने कुरतडल्याची संतापजनक घटना काल घडली. या घटनेमुळे रुग्णालयातील स्वच्छता राखण्यासाठी जबाबदार असलेल्या हाऊसकीपिंग स्टाफच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
4 hours ago
जीएमसीत उंदरांचा धुमाकूळ; शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णाचा पाय कुरतडला

पणजी : बांबोळी येथील जीएमसी रुग्णालयाच्या हाऊसकीपिंगच्या गैरव्यवस्थापनामुळे  एक धक्कादायक प्रकार समोर आला. जीएमसीच्या वॉर्ड क्रमांक १११ मध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना काल पहाटेच्या सुमारास घडली. यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, निलेश पोळजी (वय ५२, फोंडा, व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर व बिल्डर) हे पायाच्या गँग्रीनवरील उपचारासाठी जीएमसीच्या वॉर्ड क्रमांक १११ मध्ये (बेड क्र. २९) दाखल होते. त्यांच्या पायावर मंगळवारी शस्त्रक्रिया झाली होती. गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ते झोपेत असताना उंदराने त्यांच्या पायाला दोन ठिकाणी खोलवर चावा घेतला. पहाटे पाचच्या सुमारास परिचारिका रक्ताचे नमुने घेण्यासाठी आली असता निलेश यांना पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे आणि अंथरूण रक्ताने माखल्याचे निदर्शनास आले.

या घटनेबाबत बोलताना बाधित रुग्णाने सांगितले की, जीएमसीतील डॉक्टर आणि परिचारिका अत्यंत उत्तम सेवा देतात व त्यांची कोणतीही तक्रार नाही. मात्र, रुग्णालयाचे हाऊसकीपिंग व्यवस्थापन आणि स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात उंदरांचा वावर असून ते चादरी कुरतडणे, रुग्णांचे जेवणाचे डबे विस्कटणे अशा गोष्टी सतत करत असतात. यापूर्वीही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ प्रशासनाला उंदरांच्या त्रासाबद्दल पत्राद्वारे कळवले असल्याची माहिती समोर येत आहे.

एकीकडे राज्य सरकार आणि आरोग्यमंत्री गोव्यातील आरोग्य सेवा देशात सर्वोत्तम असल्याचा दावा करतात, तर दुसरीकडे जीएमसीसारख्या प्रमुख रुग्णालयात थेट रुग्णांवर उंदीर हल्ला करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रुग्णालयाने तातडीने चौकशी करून उंदरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.


हेही वाचा
सर्व पहा