विष्णू वाघ यांच्या कवितासंग्रहावरील राज्यपाल आर्लेकर यांच्या वक्तव्याला रामराव यांचा आक्षेप

वक्तव्य मागे घेऊन माफी मागण्याची मागणी; द‌िवंगत साहित्यिक तथा माजी आमदार विष्णू सूर्या वाघ यांच्या कवितासंग्रहावर केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केलेल्या कथित वक्तव्याला त्यांचे भाऊ रामराव वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. राजेंद्र आर्लेकर यांनी वक्तव्य मागे घेऊन माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
विष्णू वाघ यांच्या कवितासंग्रहावरील राज्यपाल आर्लेकर यांच्या वक्तव्याला रामराव यांचा आक्षेप

पणजी :  द‌िवंगत साहित्यिक तथा माजी आमदार विष्णू सूर्या वाघ यांच्या कवितासंग्रहावर केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केलेल्या कथित वक्तव्याला त्यांचे भाऊ रामराव वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. राजेंद्र आर्लेकर यांनी वक्तव्य मागे घेऊन माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात एक निवेदन रामराव सूर्या वाघ यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, संबंधित वक्तव्यात नाव स्पष्टपणे घेतले नसले तरी त्यातील संदर्भ दिवंगत विष्णू सूर्या वाघ आणि त्यांच्या ‘सुधीर सूक्त’ या कवितासंग्रहाशी स्पष्टपणे संबंधित होते. वक्त्यात वाघ यांच्या साहित्यामध्ये ‘अनावश्यक भाषा’ असल्याचे सांगत त्यातून वेदना झाल्याचा उल्लेख करण्यात आला. तसेच कुटुंबासमोर कविता मोठ्याने वाचता येईल का, असा प्रश्न आपण संबंधित लेखकाला विचारला होता, असा दावाही करण्यात आला.

वाघ यांचे भाऊ रामराव यांनी या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘सुधीर सूक्त’चे प्रकाशन २०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर जवळपास तीन वर्षे या पुस्तकाचे वाचन व कौतुक झाले. मात्र २०१७ मध्ये गोवा कोकणी अकादमीच्या साहित्य पुरस्कारासाठी या संग्रहाची निवड झाल्याची माहिती प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर काही लेखक व समीक्षकांनी कवितांतील भाषेवर आक्षेप घेतला,’ असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

त्या काळात विष्णू सूर्या वाघ गंभीर आजारामुळे कोमात होते आणि स्वतःच्या साहित्याबाबत झालेल्या वादाला उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी संबंधित प्रश्नाचे उत्तर दिले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. वाघ यांच्या साहित्याकडे ‘विद्रोही साहित्य’ या व्यापक परंपरेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संत तुकाराम, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेशी वाघ यांच्या लेखनाची सांगड घालत, त्यांच्या कवितांमधून जातीय विषमता, सामाजिक अन्याय आणि वंचितांच्या प्रश्नांना आवाज देण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे. 

साहित्य केवळ कुटुंबासमोर सहजपणे वाचता येण्याजोगे असावे, अशी मर्यादित व्याख्या योग्य नाही. सामाजिक वास्तवातील कटू आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना साहित्याने आवाज देणे आवश्यक आहे, असा मुद्दाही निवेदनातून मांडण्यात आला आहे. दिवगंत साहित्य‌िक विष्णू वाघ यांच्यावर सार्वज‌निक व्यासपीठावरून अशाप्रकारे टीका करणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. राज्यपालपदासारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीने अभिव्यक्तिस्वातंत्र्य, साहित्यिक स्वातंत्र्य आणि बहुविविधतेच्या घटनात्मक मूल्यांचा सन्मान करावा, अशी अपेक्षा रामराव वाघ यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना पाठवलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.


हेही वाचा
सर्व पहा