चिंचणी येथे उघड्या विजेच्या तारेचा स्पर्श होवून ७ म्हशी दगावल्या; लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल

चिंचणी येथील संतामोड्डी येथे वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे उघड्या विजेच्या तारेचा धक्का लागून सात म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामुळे पीडित शेतकऱ्यांचे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
1 hours ago
चिंचणी येथे उघड्या विजेच्या तारेचा स्पर्श होवून ७ म्हशी दगावल्या; लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल

पणजी : दक्षिण गोव्यातील चिंचणी येथील संतामोड्डी परिसरात फॉल्टी पॉवर लाईनमुळे विजेचा तीव्र धक्का लागून तब्बल सात म्हशीं दगावल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे बाधित पशुपालक व शेतकऱ्यांचे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक आणि पीडित शेतकऱ्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतामोड्डी परिसरात वीज वाहिन्यांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी वीज खात्याकडे आधीच अनेकदा तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या तक्रारींची वेळेवर दखल न घेतल्याने तुटलेल्या व उघड्या पडलेल्या विजेच्या तारेचा थेट संपर्क येऊन म्हशींना जबर शॉक बसला व त्यांचा मृत्यू झाला.

विजेचा धक्का बसून म्हशी दगावल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस प्रशासन, वीज खाते आणि स्थानिक सरपंचांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिसराची पाहणी केली व रीतसर पंचनामा पूर्ण केला. ऐन हंगामात उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेले पशुधन अचानक दगावल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना तातडीने योग्य ती भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांद्वारे केली जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा