चोर्ला गावात चोरांचा धुमाकूळ; २० दिवसांत सात घरे फोडली

पोलीस ठाण्यात अजून एकही तक्रार नसल्याने आश्चर्य

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
1 hours ago
चोर्ला गावात चोरांचा धुमाकूळ; २० दिवसांत सात घरे फोडली

कणकुंबी : खानापूर तालुक्यातील गोव्याच्या हद्दीला लागून असलेल्या चोर्ला गावात वीस दिवसांत घरफोडीचे (चोरी) सात प्रकार घडले. त्यामुळे गावात खळबळ माजली आहे. मात्र, अजूनही पोलीस ठाण्यात एकही तक्रार दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भुरट्या चोरांनी चोर्ला गावातील बंद घरांना लक्ष्य करताना कुलूप लावलेले दरवाजे फोडले व मौल्यवान वस्तू पळविल्या. त्यात पूजेची भांडे व इतर साहित्याचा समावेश आहे. एवढे सर्व होऊनही यासंदर्भात पोलीस स्थानकात तक्रार देण्यास कुणीही पुढे आले नाही. तक्रार केल्यानंतर पोलीस स्थानकात पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावल्यानंतर परत परत हेलपाटे मारावे लागतील या कारणाने तक्रार करण्यात आली नसल्याची चर्चा गावात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कणकुंबी परिसरातील चोर्ला आणि सभोवताली रोजगाराची कसलीही संधी उपलब्ध नाही. त्यामुळे गावातील लोकांना रोजगारासाठी शेजारच्या गोवा राज्यावर विसंबून रहावे लागते.  रोजगाराच्यानिमित्ताने गोव्यात असलेले चोर्ला व परिसरातील नागरिक आठवड्यातून एकदा आपल्या गावी जात असतात.

त्यामुळे घरे बंदत असतात. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कुलूप बंद घरे फोडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फोडलेल्या घरांची माहिती शेजारी किंवा जवळच्यांनी पाहिल्यानंतर उघड होत आहे. अशाप्रकारे चोरी करणारे भुरटे चोर असावेत असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकातील या गावाची नोकरी, रोजगाराच्यानिमित्ताने गोव्याशी नाळ जोडली आहे. मात्र चोरीची तक्रार द्यायची असल्यास खानापूर पोलीस ठाण्यात जावे लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.  

हेही वाचा
सर्व पहा