पर्वरी : येथील ‘निओ मॅजेस्टिक ह्या कॅसिनो आणि हॉटेलच्या परिसरात मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेला गोळीबार त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता की केवळ भीती निर्माण करण्यासाठी हा हल्ला घडवून आणला होता याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्याच्या पद्धतीवरून हा प्रकार ‘स्क्रिप्टेड’ होता का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
दोन शुटर्सनी नायक यांच्या दिशेने तीन राऊंड गोळीबार केला. त्याचवेळी नायक यांच्या सुरक्षा रक्षकांनीही प्रत्युत्तरादाखल तीन राऊंड गोळीबार केला. मात्र, दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात कोणालाही इजा झाली नाही. शुटरचे नेम चुकलेच, मात्र त्यांच्यावर प्रत्युत्तरादाखल गोळीबार करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचाही नेम कसा चुकला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, दोन्ही संशयितांचे चेहरे घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले आहेत. तरीही अद्याप कोणत्याही संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पर्वरीसारख्या गजबजलेल्या भागात हल्लेखोर नेमके कुठे आणि कसे गायब झाले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांनी विविध पथके तयार करून त्यांना वेगवेगळ्या दिशेने तपासासाठी रवाना केले आहे. घटनास्थळावरून काडतुसांचे शेल्सही जप्त करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि हल्लेखोरांच्या हालचालींच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.

श्रीनिवास नायक यांचे नाव यापूर्वीही विविध वादांमध्ये चर्चेत आले आहे. त्यांनी यापूर्वी एका राजकीय नेत्याचे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यामुळे या हल्ल्यामागे नेमके कोणते कारण आहे, तसेच हल्लेखोरांचा उद्देश काय होता, याबाबत विविध शक्यता व्यक्त होत आहेत.

दरम्यान, नायक यांना लक्ष्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेताना पोलिसांसमोर अनेक प्रश्न आहेत. तपासातूनच या गोळीबारामागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र दोन्ही बाजूंच्या पिस्तुलधारकांचे नेम कसे चुकले, याचीच चर्चा रंगली आहे.


