गोव्यातील गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पर्वरी येथे कॅसिनो संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेत संशयितांना तातडीने अटकेचे निर्देश दिले असून, पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
1 hours ago
गोव्यातील गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी: पर्वरी येथे ‘निओ मॅजेस्टिक’ येथे कॅसिनो संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची राज्य सरकार आणि गृहखात्याने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, अशा प्रकारचे गुन्हे गोव्यात अजिबात सहन केले जाणार नाहीत, असा कडक इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. या प्रकरणातील संशयित हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून गजाआड करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि गृह विभागाला देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  



मुख्यमंत्र्यांनी घटनेबाबत सविस्तर बोलताना सांगितले की, काल रात्री पर्वरी येथे घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा घेतला. गोव्यासारख्या शांतताप्रिय राज्यात एका उद्योजकावर अशा पद्धतीने गोळीबार होण्याची घटना अत्यंत खेदजनक आहे. गेल्या पाच ते आठ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात एखाद्या व्यावसायिकावर गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना घडली असून, राज्य सरकार या प्रकरणाबाबत अत्यंत गंभीर आहे. हा गोळीबार कोणत्या कारणास्तव झाला, त्यामागे नक्की कोणाचा हात आहे आणि कोणी हा हल्ला घडवून आणला, या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस प्रशासन कसून तपास करत आहे.



बंदुकीचा वापर करून हल्ला करणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना अत्यंत कमी कालावधीत गजाआड केले जाईल. यापुढे अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना सरकार आणि पोलीस खात्याकडून अजिबात सहन केले जाणार नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार सातत्याने आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या व कठोर पावले उचलत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वरी येथील ‘निओ मॅजेस्टिक’ येथे कॅसिनो संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत आहेत. अद्याप कोणत्याही संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले नसले, तरी पोलिसांची विविध विशेष पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेने कामाला लावण्यात आली आहेत.

घटनास्थळाची सखोल पाहणी करून पोलिसांनी तेथून काडतुसांच्या नळकांड्या (बुलेट शेल्स) जप्त केल्या आहेत. या प्रकरणामागील सर्व संभाव्य शक्यता तपासल्या जात असून, गोळीबाराचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी आणि हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी उपलब्ध धागेदोरे, पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलीस महासंचालकांनी व्यक्त केला.

काल शुक्रवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक हे आपल्या सुरक्षारक्षकांसह गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असताना मागील बाजूला दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर ३ राऊंड फायर केले. प्रत्युत्तरादाखल नायक यांच्या सुरक्षारक्षकांनी देखील टींन राऊंड फायर केले. श्रीनिवास नायक व त्यांचे सुरक्षारक्षक सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून बालंबाल वाचले.

घटनेनंतर तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी करत तपासाला गती दिली. हल्ल्यानंतर दोघे हल्लेखोर दोन वेगवेगळ्या दिशांना पळताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले गेले असून, जवळच उभ्या केलेल्या दुचाकीवरून ते पसार झाल्याचे समोर आले आहे. पोलीस सध्या या फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढत आहेत.

बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा