राष्ट्रीय स्तरासाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदत देणार : मुख्यमंत्री

मागील काही वर्षांत राज्य सरकार खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. यातीलच एक भाग म्हणून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना तसेच क्रीडा संघटनांना आर्थिक मदत तसेच आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
राष्ट्रीय स्तरासाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदत देणार :  मुख्यमंत्री

पणजी : मागील काही वर्षांत राज्य सरकार खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. यातीलच एक भाग म्हणून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना तसेच क्रीडा संघटनांना आर्थिक मदत तसेच आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. 

शनिवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री रमेश तवडकर, संचालक अजय गावडे, सचिव संतोष सुखदेवे व अन्य अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी मागील तीन वर्षांच्या पुरस्कारांची रक्कम प्रदान करण्यात आली.  

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील खेळाडूंशी संवाद साधला. त्यांनी २०३६ मध्ये भारतात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी आतापासून करण्याचा सल्ला दिला. राज्यातील युवकांसह लहान मुलांनी देखील क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून पहावे. वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षापासून ऑलम्पिक मधील एखाद्या खेळाची निवड करून त्याचा सराव सुरू करावा. क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांनी ही जबाबदारी घ्यावी. क्रीडा क्षेत्राला दुय्यम समजू नये. यामध्ये देखील ‘करिअर’च्या अनेक संधी आहेत. 

ते म्हणाले, सरकारने मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. आम्ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील यशस्वीपणे आयोजित केल्या आहेत. यापुढे देखील आधुनिक सुविधा उभारल्या जातील. अधिकाधिक मुले या क्षेत्रात आल्यास फिट इंडिया, नशा मुक्त भारत याचे स्वप्न देखील साकार होईल. खेळाडूंना वेळोवेळी प्रोत्साहनाची गरज असते याची आम्हाला जाणीव आहे. पुरस्कारामुळे खेळाडूंचा उत्साह वाढण्यास मदत होते. यामुळेच आम्ही मागील तीन वर्षे प्रलंबित असणारे पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा
सर्व पहा