मडगाव: यावर्षीचा मासेमारी हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण होण्यापूर्वीच कुटबण जेटीवर डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. येथील दोन कामगारांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने सतर्कता बाळगत उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत कुटबण जेटी परिसरातील सुमारे अडीच हजार कामगारांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली असून साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी व्यापक खबरदारी घेतली जात आहे.
डेंग्यूची लागण झालेल्या दोन्ही कामगारांना उपचारासाठी बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसह जेटी परिसरात कार्यरत असणाऱ्या इतर सर्व कामगारांच्या आरोग्यावर आरोग्य पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गेल्या दोन वर्षांत कुटबण जेटी परिसरात डेंग्यू आणि कॉलरा यांसारख्या साथीच्या आजारांचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा आरोग्य विभागाने अधिक कडक भूमिका घेतली आहे. जेटीवर पुन्हा आजारांचा फैलाव झाल्यास त्यासाठी ट्रॉलर मालकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा आरोग्य विभागाने मत्स्यव्यवसाय विभागाला दिला आहे.
दरम्यान, जेटी परिसरातील स्वच्छता, साचलेले पाणी आणि डासांची उत्पत्तीस्थाने शोधून त्यावर प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, कुटबण जेटीवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच जेटी परिसरात उभ्या असलेल्या अनधिकृत लहान होड्यांच्या गर्दीमुळे स्वच्छता मोहीम आणि डास नियंत्रण उपायांमध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत. जेटीवर नियमित स्वच्छता राखणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि डासोत्पत्ती रोखणे अत्यंत आवश्यक असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.


