बागा येथे पहाटे टॅक्सीची रेंट-अ-बाईकला धडक; चंदीगड येथील पर्यटकाचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

बागा येथे अर्टिगा टॅक्सी आणि स्कुटर यांच्यात झालेल्या अपघातात चंदीगड येथील संजय जुनिजा यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा कुणाल गंभीर जखमी झाला. पोलिसांनी टॅक्सी चालकाला ताब्यात घेतले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
14 mins ago
बागा येथे पहाटे टॅक्सीची रेंट-अ-बाईकला धडक; चंदीगड येथील पर्यटकाचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

पणजी: बागा मुख्य रस्त्यावर रविवारी पहाटे ४:३० च्या सुमारास अर्टिगा टॅक्सी आणि फॅसिनो स्कुटर (रेंट-अ-बाईक) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चंदीगड येथील संजय जुनिजा (वय ५५) या पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुचाकी चालवणारा त्यांचा मुलगा कुणाल जुनिजा हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कलंगूटकडून बागाच्या दिशेने जाणाऱ्या अर्टिगा टॅक्सीने समोरून येणाऱ्या फॅसिनो स्कुटरला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघाताच्या वेळी स्कुटरवरून चंदीगड येथील पिता-पुत्र प्रवास करत होते. दुचाकीच्या मागे बसलेले संजय जुनिजा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कुणाल हा गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच कलंगूट पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पीएसआय स्नेहल मलिक यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमीला जीएमसीत हलवले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलिसांनी टॅक्सी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा