गावकरवाडा-उसगाव येथे वन खात्याच्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या

वन खात्याची कारवाई; नागरिकांसह वाहनचालकांनी घेतला सुटकेचा निश्वास

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
29th August, 11:54 pm
गावकरवाडा-उसगाव येथे वन खात्याच्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या

फोंडा : गावकरवाडा-उसगाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वन खात्याने लावलेल्या सापळ्यात अडकला. शुक्रवारी रात्री बिबट्या सापळ्यात अडकल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविले. शनिवारी सकाळी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून बिबट्याला सुखरूप ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचारासाठी त्याला नेण्यात आले.
गावकरवाडा परिसरात बिबट्याचा वावर गेल्या काही महिन्यांपासून वाढला होता. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सुमारे दोन महिन्यांपूर्वी गावकरवाडा येथील वाळपईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रात्री कामावरून घरी जात असलेल्या दोन युवकांच्या दुचाकीला बिबट्याची धडक बसली होती. या अपघातात दोन्ही युवक जखमी झाले होते. त्यापैकी एका युवकावर अद्याप उपचार सुरू आहेत.
परिसरात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेऊन वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. शुक्रवारी रात्री बिबट्या या सापळ्यात अडकला. स्थानिकांनी तत्काळ वन खात्याला माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी पोहोचून बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
उत्तर गोव्याचे उपवनपाल जिस वर्की यांच्या मार्गदर्शनाखाली वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
गुरांचीही केली होती शिकार
झरीवाडा-उसगाव परिसरातील एका कोंडवाड्यातील काही गुरांची बिबट्याने शिकार केली होती. तसेच तिराळ-उसगाव परिसरातही बिबट्याचा वावर वारंवार आढळून येत होता. त्यामुळे स्थानिक नागरिक तसेच या मार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.      

हेही वाचा
सर्व पहा