असाम किंवा नेपाळमधील अलिकडच्या महापुराची भीषण दृश्ये आपण पाहिली आहेत. पुराचे पाणी ओसरते आणि मदतकार्य पोहोचते, तेव्हा या संकटाची तीव्रता संपली असा समज निर्माण होणे सोपे असते. परंतु, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास, बातम्यांचे मथळे बदलले तरी आपत्तीचा शेवट होत नाही. अनेक वाचलेल्यांसाठी (सर्व्हायव्हर्स) सर्वात टिकाऊ आणि खोल असणारे नुकसान हे 'अदृश्य' असते. भौतिक विनाश साफ झाल्यानंतरही, त्यांनी अनुभवलेला मानसिक आघात त्यांच्या भावना, विचार आणि वर्तनाला कायमचे बदलून टाकतो.
हीच पोस्ट-ट्रॉमाटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) ची वास्तवता आहे. पुरासारख्या अचानक आणि भयानक नैसर्गिक आपत्तींनंतर उद्भवणारी ही एक मानसिक स्थिती आहे, जी महिने, वर्षे किंवा आयुष्यभर कायम राहू शकते. केवळ नैसर्गिक आपत्तीच नव्हे, तर युद्धे, दहशतवाद, तीव्र शारीरिक-मानसिक हल्ले, भीषण अपघात किंवा इतरांच्या वेदनांचा सातत्याने होणारा सामना यामुळेही PTSD होऊ शकतो.
PTSD म्हणजे केवळ एखाद्या वाईट घटनेमुळे दुःखी होणे नव्हे. ती लक्षणांची एक विशिष्ट मालिका आहे. यात घटनेच्या त्रासदायक आठवणी वारंवार डोळ्यांसमोर येणे (फ्लॅशबॅक्स), भीतीदायक स्वप्ने पडणे, मनःस्थिती आणि विचारांमध्ये नकारात्मक बदल होणे आणि हे जग अत्यंत असुरक्षित असल्याचा सतत भास होणे यांचा समावेश होतो. या त्रासातून जाणारी व्यक्ती अतिशय संवेदनशील, चिडचिडी, अतिजागरूक (हायपरव्हिजिलंट) बनते आणि तिला निद्रानाशाचा त्रास सहन करावा लागतो.
कोणत्याही वाईट घटनेतून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला PTSD होतोच असे नाही. ज्यांना हा त्रास होतो, त्यांच्या बरे होण्याच्या प्रवासातही फरक असतो. काही जण सुरुवातीला तीव्र तणाव अनुभवतात; पण वेळेनुसार पूर्ववत होतात. तर काही जण या चक्रात अडकून पडतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्याचा दर्जा खालावतो. ज्यांनी जवळच्या व्यक्तीला गमावले आहे, ज्यांना आधीपासून मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या किंवा ज्यांच्याकडे सामाजिक आधाराचा अभाव होता, अशा लोकांमध्ये हा धोका जास्त असतो. भारतात विशेषतः स्त्रियांमध्ये PTSD चा धोका अधिक असल्याचे आढळले आहे. याउलट, भक्कम कौटुंबिक व सामाजिक पाठिंबा, मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता आणि स्थिर उत्पन्न या गोष्टी माणसाला या संघर्षात सक्षम बनवतात.
नॉरीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (२००८) मांडलेल्या आपत्तीच्या 'इकोलॉजिकल मॉडेल'नुसार, आपत्तीनंतरचे समायोजन हे धोक्याचे घटक आणि संरषक संसाधने यांच्यातील समतोलावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, पुरामध्ये घर गमावलेल्या एखाद्या व्यक्तीला जर समाजाचा पाठिंबा, वेळेवर मदत आणि समुपदेशन मिळाले, तर ती व्यक्ती 'पोस्ट-ट्रॉमाटिक ग्रोथ' म्हणजेच सकारात्मक मानसिक बदलाकडे वाटचाल करू शकते. परंतु, हीच व्यक्ती जर एकाकी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल, तर ती जुनाट (क्रॉनिक) PTSD, नैराश्य आणि व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकू शकते.
काही लोक PTSD मधून पूर्णपणे बाहेर का पडू शकत नाहीत? याचे उत्तर आघाताच्या स्वरूपात दडलेले आहे. सामान्य आठवणींपेक्षा आघातजन्य आठवणी व्यक्तीच्या जीवनप्रवासात घट्ट विणल्या जातात. यामुळे ही घटना वर्षांनंतरही 'अजूनही सुरूच आहे' असा भास होतो. एहलर्स आणि क्लार्क (२०००) यांच्या सिद्धांतानुसार, जेव्हा आघात हा सततचा धोका मानला जातो, तेव्हा हा आजार कायम राहतो. पूरप्रवण क्षेत्रात हा धोक्याचा अंदाज वास्तववादी असतो. योग्य मानसशास्त्रीय उपचारांशिवाय, मन भूतकाळातील धोका आणि वर्तमान सुरक्षितता यातील फरक ओळखू शकत नाही.
मग यावर उपाय काय? सर्वात आधी, मानसिक आरोग्याला वेळेची गरज असते हे स्वीकारले पाहिजे. सामाजिक संपर्क वाढवल्यास एकाकीपणा कमी होतो. लक्षणे महिनाभरापेक्षा जास्त काळ राहिल्यास तज्ज्ञांचे समुपदेशन किंवा वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. जिथे मानसशास्त्रीय मदत उपलब्ध नाही, तिथे support groups आणि स्थानिक स्वयंसेवकांना दिलेले 'सायकोलॉजिकल फर्स्ट एड' (प्राथमिक मानसोपचार) हे वरदान ठरू शकते. दिनचर्या सांभाळणे, ध्यानधारणा, शारीरिक व्यायाम आणि सांस्कृतिक किंवा अध्यात्मिक पद्धती मनाला सुरक्षितता आणि आशेचा किरण दाखवू शकतात.
आपत्ती ही केवळ एक घटना नसून तो एक प्रदीर्घ प्रवास आहे, जो अदृश्य व्रण सोडून जातो. PTSD हा असाच एक व्रण आहे; पण ती आयुष्यभराची शिक्षा नाही. पुराचे पाणी ओसरल्यावर उपचार संपत नाहीत, तर खरी पुनर्प्राप्ती तिथूनच सुरू होते!

डॉ. उबाल्डिना नोरोन्हा
(सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग,
सेंट झेविअर्स कॉलेज, म्हापसा)


