पणजीतील वाढती वाहतूक कोंडी : कारणे आणि उपाय

बेशिस्त पार्किंग, ई-बसचे अनधिकृत थांबे, अपुरे रस्ते आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पणजीतील वाहतूक कोंडी वाढली आहे. यावर स्मार्ट पार्किंग, सिग्नल-एआय कॅमेरे, कडक कारवाई आणि सुसज्ज सार्वजनिक वाहतूक हेच प्रभावी उपाय ठरतील.

Story: कॉलिंग अटेंशन |
29th August, 11:41 pm
पणजीतील वाढती  वाहतूक कोंडी :  कारणे आणि उपाय

​राज्याच्या राजधानीच्या अनेक समस्या आहेत. पणजीला कोणी वाली नसल्याने समस्या उग्र बनत चालल्या आहेत. सध्या शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जटिल बनली आहे. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर देखील वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. सण, उत्सव किंवा प्रदर्शन असेल तर शहरात वाहतूक कोंडी ठरलेली असते. वाढलेल्या लोकसंख्येसाठी तसेच वाहनांसाठी आधीच अरुंद असणारे पणजीतील रस्ते अपुरे पडत आहेत. काळानुसार राजधानीच्या शहरातील वाहतूक कोंडी वाढणार याचा विचार करून उपाययोजना करणे आवश्यक होते. ही प्रशासनासह, लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांची देखील जबाबदारी होती. शहरातील रहिवाशी भागात व्यावसायिक आस्थापने असल्यास वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होते हे समजायला हवे होते. लोकप्रतिनिधी, स्थानिक किंवा पणजीत वाहने चालवणारे बहुतेक वाहनचालक असोत, सर्वजण आपआपल्या जबाबदारीत कमी पडत आहेत.

वाढलेल्या वाहनांसह शहरातील वाहतूक कोंडीमागे विविध कारणे आहेत. बेशिस्त पद्धतीने केलेले पार्किंग, रस्त्यावर अगदी कुठेही गाडी थांबवणे, स्मार्ट सिटी ई-बसद्वारे घेतले जाणारे अनधिकृत बस थांबे, न चालणारे सिग्नल आणि एआय कॅमेरे, वाहतूक पोलिसांची कमतरता, काही वाहतूक पोलिस आणि होमगार्डची आपल्या कामाप्रती अनास्था, एकूणच वाहतूक नियोजन नसणे अशा विविध कारणांमुळे शहरातील कोंडी वाढली आहे. शहरातील रस्त्यांवर केले जाणारे अस्ताव्यस्त आणि बेशिस्त पद्धतीचे वाहन पार्किंग वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहे. शहरात काही ठराविक ठिकाणीच पे-पार्किंग उपलब्ध आहे. बहुतेक वेळेस हे पार्किंग भरलेले असते. त्यामुळे येथे चारचाकी तर सोडाच, दुचाकी पार्क करण्यासाठी देखील जागा मिळत नाही. शिल्लक जागेत रेंट-ए-कार किंवा बाईक लावून ठेवल्या जातात. अशावेळी पार्क केलेल्या वाहनांच्या मागेच वाहने पार्क केली जातात. पे-पार्किंगचे शुल्क घेणाऱ्या व्यक्तीच डबल पार्किंगसाठी मदत करतात. काही ठिकाणी तर इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग स्टेशनच्या जागेतच चारचाकी पार्क केल्या जातात.

याशिवाय रस्त्यावर अगदी कुठेही वाहन थांबवून "दोनच मिनिटात येतो" असे म्हणून निघून जाणाऱ्या चालकांमुळे देखील वाहतूक कोंडी होत आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर दुतर्फा पार्किंग असते. अशावेळी वळणावर, पार्क केलेल्या वाहनांच्या मागेच वाहने लावल्यास वाहतुकीला अडथळा होतो. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याची मुख्य जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. मात्र अनेकदा ते या जबाबदारीत कमी पडत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी वाहतूक नियम उल्लंघनाविरोधात कडक कारवाई केल्यास शहरातील वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल. यासाठी चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने उचलणे, अशा चालकांना मोठा दंड करणे अशी कारवाई सुरू झाली पाहिजे. ई-चलन तर द्यावेच शिवाय वाहतूक देखील सुरळीत केली पाहिजे. राजकारणी किंवा अन्य नेत्यांच्या दबावाला बळी न पडता पोलिसांनी आपले काम योग्य पद्धतीने केले पाहिजे.

केंद्रीय अहवालानुसार राज्यात प्रति कुटुंब वाहनांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. एकाच कुटुंबात तीन ते चार चारचाकी आणि एक किंवा दोन दुचाकी आहेत. गंमत म्हणजे ही गोष्ट अभिमानाने सांगितली जाते. मुळात अपुरी आणि खर्चिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने लोकांना स्वतःची वाहने घ्यावी लागतात. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू झालेली ई-बस माफक दरात वाहतूक सेवा देत आहे. या सेवेची व्याप्ती अधिक वाढली पाहिजे. शहरात सर्वत्र आणि नियमित बस सेवा सुरू झाल्यास वाहतूक कोंडीला वैतागलेले लोक नक्कीच याचा वापर करतील. मात्र या बस सेवेने देखील वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. सध्या या बस रस्त्यात कुठेही थांबत आहेत. रस्त्यावरील कुणीही हात दाखवल्यावर या बस थांबतात. प्रवासी बसमध्ये चढेपर्यंत मागे वाहनांच्या रांगा लागतात. पणजीसह भाटले, ताळगाव, सांताक्रूझ येथेही या बसमुळे वाहतूक कोंडी होत आहे. स्मार्ट बसना केवळ अधिकृत बस थांब्यावर थांबणे सक्तीचे केले पाहिजे.

पणजी राजधानीचे शहर आणि पर्यटन स्थळ असल्याने येथे दररोज हजारो खासगी, भाड्याची वाहने, पर्यटकांच्या बस, टॅक्सी, दुचाकी शहरात प्रवेश करतात. दयानंद बांदोडकर मार्ग आणि १८ जून रोड यांसारख्या प्रमुख रस्त्यांवर गर्दीच्या वेळी प्रचंड कोंडी होते. या रस्त्यांवरील कोंडी कमी करण्यासाठी येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिस तैनात करणे आवश्यक आहे. शहरातील प्रमुख रस्ते वगळता, बहुतेक सिग्नल आणि कॅमेरे बंद आहेत. ही यंत्रणा सुरू केल्यास वाहतूक पोलिस नसणाऱ्या ठिकाणी वाहतूक समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल. एआय कॅमेराद्वारे चलन देणे सुरू झाल्यास चालकांना देखील शिस्त येईल.

पाटो आणि कांपाल येथे बहुमजली पार्किंग उभे केल्यास बाहेरील वाहने शहराच्या मध्यवर्ती भागात न येता तिथेच पार्क करता येतील. शहरात डॉन बॉस्को शाळेसमोरील सरकारी जागेत मोठा पार्किंग प्रकल्प बांधता येणे शक्य आहे. यामुळे पणजी बाजार परिसरातील वाहतूक सुरळीत होईल.

रस्ते रुंदीकरण शक्य नसलेल्या ठिकाणी नो-पार्किंग क्षेत्र अथवा केवळ पादचारी क्षेत्र जाहीर करता येईल. शहरातील व्यावसायिक आणि ऐतिहासिक परिसर वाहनांसाठी पूर्णपणे बंद करून केवळ पादचाऱ्यांसाठी खुले करावेत. यामुळे प्रदूषण देखील कमी होईल. अॅप-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून चालकांना पार्किंगची माहिती थेट उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; जेणेकरून पार्किंगच्या शोधात फिरणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी टाळता येऊ शकते. योग्य नियोजन, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्मार्ट पार्किंग, सिग्नल व एआय कॅमेऱ्यांचा प्रभावी वापर, पादचारी क्षेत्र घोषित करणे आणि वाहतूक उल्लंघनावर कडक कारवाई करणे अशा उपाययोजना केल्यास पणजीची वाहतूक समस्या कमी करता येऊ शकते.


​पिनाक कल्लोळी
(लेखक गोवन वार्ताचे प्रतिनिधी आहेत.)