मध्यरात्री फोंडा उड्डाणपुलावरून कार कोसळून भीषण अपघात; एकजण ठार, चौघे जखमी

कदंब बस स्थानकाजवळ मध्यरात्री १:३० च्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव कार पुलाचा कठडा तोडून खाली कोसळल्याने हवेलीतील प्रदीप गौडा या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर ४ जण जखमी आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
7 mins ago
मध्यरात्री फोंडा उड्डाणपुलावरून कार कोसळून भीषण अपघात; एकजण ठार, चौघे जखमी

फोंडा: येथील कदंब बसस्थानकाजवळील उड्डाणपुलावरून मध्यरात्री एक भरधाव कार थेट खाली कोसळल्याने भीषण अपघात घडला. रविवारी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत हवेली-फोंडा येथील प्रदीप गौडा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील अन्य चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगातील कार उड्डाणपुलावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पुलाचा कठडा तोडून थेट खाली महामार्गावर कोसळली. या भीषण अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच फोंडा अग्निशामक दल व आपत्कालीन सेवेच्या जवानांनी तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जवानांनी कारचे पत्रे कापून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

या अपघातात प्रदीप गौडा यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजते. अतिवेगामुळे चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी फोंडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचा सविस्तर पंचनामा करून पुढील तपास करत आहे.

हेही वाचा
सर्व पहा