मडगाव : चांगल्या ब्रँडचा अँड्रॉइड मोबाईल मिळवण्याच्या हव्यासातून मित्र अर्जुन शर्मा (२५) याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या प्रदीप यादव याचा जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
या प्रकरणातील अर्जुन शर्मा आणि प्रदीप यादव हे दोघेही उत्तर प्रदेशातील कुशीनगर परिसरातील रहिवासी असून कामानिमित्त गोव्यात राहत होते. पोलिसांच्या तपासानुसार, २०२३ मध्ये महागडा मोबाईल मिळवण्याच्या उद्देशाने प्रदीपने अर्जुनची हत्या केली आणि त्याचा मोबाईल घेऊन उत्तर प्रदेशातील मूळ गावी पलायन केले. केपे पोलिसांनी संशयिताला उत्तर प्रदेशातून अटक केली होती.
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने संशयिताविरोधात उपलब्ध असलेल्या पुराव्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. हत्येपूर्वी अर्जुन शर्मा आणि प्रदीप यादव हे दोघेही दिवाकर बार अँड रेस्टॉरंटमध्ये एकत्र दारू पीत होते. तसेच, संशयिताच्या सांगण्यावरून गुन्ह्यात वापरलेली कुदळ आणि अर्जुनचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे प्रदीपचा गुन्ह्याशी प्रथमदर्शनी थेट संबंध असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
उपलब्ध प्राथमिक पुरावे, गुन्ह्याचे गांभीर्य आणि प्रकरणातील परिस्थिती लक्षात घेता संशयित प्रदीप यादवला जामीन देणे योग्य ठरणार नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवत त्याचा जामीन अर्ज फेटाळला.
संशयित तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात
बचाव पक्षाने संशयित प्रदीप हा तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असून, प्रकरणातील १७ पैकी केवळ सात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आल्याचे सांगितले. खटला पूर्ण होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता असल्याने जामीन देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, केवळ खटल्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने गंभीर गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.


