पर्वरी फ्लायओव्हरचे ९ सप्टेंबरला उद्घाटन; ११ पासून वाहतूक सुरू

पर्वरी ते गिरी दरम्यानच्या ५.१५ किमी उड्डाणपुलाचे उद्घाटन ९ सप्टेंबरला नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून, ११ सप्टेंबरपासून वाहतूक सुरू होईल. ७ व ८ सप्टेंबरला नागरिकांना पुलावर चालण्याची मुभा असेल.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
4 hours ago
पर्वरी फ्लायओव्हरचे ९ सप्टेंबरला उद्घाटन; ११ पासून वाहतूक सुरू

पणजी: पर्वरी येथील बहुप्रतिक्षित सहापदरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचे भव्य उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर दोन दिवसांनी, म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून या उड्डाणपुलावरून वाहनांची वाहतूक अधिकृतपणे सुरू केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पर्वरी ते गिरी दरम्यानच्या ५.१५ किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत 'आरआरएसएम इन्फ्रा' (RRSM Infra) या कंत्राटदार कंपनीमार्फत पूर्ण करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी माहिती देताना मंत्री दिगंबर कामत यांच्यासोबत पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार केदार नाईक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता संदीप चोडणेकर उपस्थित होते.

उद्घाटनापूर्वी सर्वसामान्य नागरिकांसाठी एक विशेष संधी देण्यात आली असून ७ आणि ८ सप्टेंबर रोजी नागरिकांना या फ्लायओव्हरवर फिरण्याची व छायाचित्रे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, या दोन दिवसांत पुलावर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

पर्वरी येथील 'मॅजेस्टिक हॉटेल'जवळ उद्घाटनाचा मुख्य सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाला सुमारे ३ ते ४ हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या सोहळ्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना गिरीच्या बाजूने प्रवेश दिला जाईल, तर मंत्री आणि आमदारांसाठी पर्वरीच्या बाजूने प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व निमंत्रितांनी कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उड्डाणपुलावर राष्ट्रीय महामार्गाचे सर्व वाहतूक नियम लागू राहतील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा